
सामना प्रतिनिधी । पिंपरी
पेट्रोल, डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातून शेतकरीदेखील सुटला नाही. बहुतांश शेतकरी शेतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतात. ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या कामांची भाडेवाढ झाल्यामुळे डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या आठवड्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीने तर कहरच केला आहे. सध्या जवळपास ८५ रुपये प्रतिलिटर पेट्रोल, तर डिझेलही ७२ रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच मध्यमवर्गीय, नोकरदार, आयटी कंपन्यांमध्ये कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरदेखील तीव्र भावना पाहावयास, ऐकावयास मिळत आहेत. शेतकरी सध्या खरिपाच्या पेरणीसाठी तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमधील बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करीत आहेत.
पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या विविध कामांचीदेखील भाडेवाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच स्तरांतील घटकांसह शेतकरी, कामगार, तसेच प्रत्येक व्यवसायावर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरसुद्धा तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. इंधन दरवाढीचा जसा रोजच भडका होतो, तसा भडका व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल साईटवरही होताना दिसत आहे.
शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता होरपळून जात असताना शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. ८० रुपयांच्या खाली पेट्रोल आणि ७० रुपयांच्या आत डिझेलचा दर असताना दरवाढ कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, त्यानंतरही दरवाढीचा आलेख वाढतच गेल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांचाही अपेक्षांचा भंग झाला आहे.
शेती मशागतीचा खर्च वाढला
सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस येऊन ठेपल्याने मशागतीचा कामांना वेग आला आहे. या कामांसाठी मजुरांची गरज भासू लागली आहे. यंदा मजुरीचे दर ५० ते ८० रुपयांनी तर मशागतीसाठी लागणाऱ्या वाहनांचे दर डिझेल दरवाढीमुळे ३०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. पूर्वी शेतीत कामाला जाताना तीन ते चार किमी अंतरापर्यंत मजूर पायी चालत जायचे. आता मात्र शेतकऱ्यांना आपले वाहन घेऊन मजुरांना घेण्यासाठी सकाळीच सगळे काम सोडून त्यांच्या घरी जावे लागत आहे.इतर खेड्यातूनही मजूर शोधण्यासाठी आणि त्यांना आपल्या शेतापर्यंत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन खर्च अधिक होत आहे. इंधन दरवाढीमुळे अत्याधुनिक पद्धतीने शेती मशागत करण्यासाठी मागील वर्षापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे.






























































