चारधाम यात्रेवर इंधन तुटवड्याचा परिणाम, बुकिंगमध्ये 80 टक्के घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होईल. चारधाम यात्रा मार्गावरील हॉटेल व्यावसायिक केवळ व्यावसायिक गॅसबद्दलच नव्हे, तर रूम बुकिंगसाठी येणाऱ्या कमी फोन कॉल्समुळेही चिंतेत आहेत. इंधन संकटाचा परिणाम चारधाम यात्रेच्या बुकिंगवर होऊ लागला आहे. यात्रेसाठी नोंदणी नऊ लाखांच्या पुढे गेली आहे, परंतु हॉटेल आणि वाहनांच्या बुकिंगमध्ये ५० ते ८० टक्क्यांनी घट झाली आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरकाशी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र सिंह मटुडा यांच्या मते, मोठ्या संख्येने यात्रेकरू आपल्यासोबत स्वयंपाकाची भांडी घेऊन येतात. हे यात्रेकरू स्वयंपाकघरासह खोल्या बुक करतात आणि स्वतःचे जेवण बनवतात. ते अनेकदा व्यावसायिक सिलिंडर सोबत आणतात, जे स्थानिक हॉटेल चालकांकडून पुन्हा भरले जातात. मात्र, यावेळी त्यांना सिलिंडर मिळतील याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. यामुळे असे गट बुकिंग करण्यापासून परावृत्त होत आहेत. केदारनाथ हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सचिव मनोज सेमवाल यांच्या मते, हॉटेल बुकिंगमध्ये ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

टूर ऑपरेटर अवधेश कपूर यांच्या मते, अनिश्चिततेमुळे लोक आपल्या सहलींचे नियोजन करू शकत नाहीत, त्यामुळे आतापर्यंत खूप कमी बुकिंग्स मिळाली आहेत. शिवाय, गेल्या आठवड्यात प्रवासाच्या बुकिंगसंदर्भातील फोन कॉल्समध्येही घट झाली आहे.

गॅस आणि तेलाच्या संकटामुळे हरिद्वारमधील प्रवाशांच्या बुकिंगमध्ये ८०% घट झाली आहे. प्रवासी गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या उपलब्धतेबद्दल चौकशी करत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, सामान्य वर्षांमध्ये, बहुतेक वाहने यात्रा सुरू होण्याच्या एक महिना आधीच बुक केली जातात आणि प्रवासी आगाऊ रक्कमही भरतात. या वेळी, आतापर्यंत केवळ २०% बुकिंग निश्चित झाली आहेत.

शनिवारी सचिवालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऊर्जेच्या गरजांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत घरगुती आणि व्यावसायिक गॅसची उपलब्धता, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांच्या गरजा, आगामी चारधाम यात्रेदरम्यान मागणीत होणारी संभाव्य वाढ, खतांची स्थिती आणि पीएनजी पाईपलाईनचा विस्तार यांसारख्या विषयांवर चर्चा झाली.