
ठाण्यातील वाहतुकीच्या प्रमुख धमन्यांपैकी एक असलेल्या गायमुख घाटरस्त्याच्या दुरुस्तीला पावसाने खो घातला आहे. या घाटाच्या रस्ते दुरुस्तीचे काम आजपासून हाती घेण्यात आले होते. सुट्टीचे दिवस असल्याने तीन दिवस पूर्णपणे घाट बंद करून काम करण्यात येणार होते. मात्र संततधारेमुळे पहिल्याच दिवशी रस्त्यावर मास्टिक टाकण्यास प्रचंड अडचणी आल्या. दरम्यान, या कामाला पुढची तारीख देण्यात आल्याने वाहनचालकांना अजूनही काही दिवस खड्ड्यातूनच कंबरमोड प्रवास करावा लागणार आहे.
मीरा रोड, भाईंदर तसेच अहमदाबाद या भागातून ठाणे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गायमुख घाटात प्रचंड खड्डे पडले आहेत. या गायमुख टाकण्यास अडचण घाटाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून आता प्रवाशांनीदेखील या मार्गाचा धसका घेतला आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात दुरुस्तीसाठी तीन दिवसांसाठी घाट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता सुधारणा प्रकल्पांतर्गत हे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले होते. 15 ते 18 ऑगस्टपर्यंत या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूक विभागाने प्रवेशबंदी केली होती. घाटातील रस्त्याच्या डांबरीकरण करून रस्ता खड्डेमुक्त करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र या घाट मार्गावर पावसाने थैमान घातले असल्याने खड्डे बुजवताना शासकीय यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहे.
वाहतूक बदलीचा निर्णय त्वरित रद्द
8 ऑगस्टपासून तीन दिवस हा रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण आणि सुरक्षितता सुधारणा या कामांसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने पुन्हा तीन दिवसांसाठी वाहतूक पूर्णपणे पर्यायी मार्गावर वळवली होती. मात्र आता ठाणे वाहतूक विभाग आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी वाहतूक बदलीचा निर्णय त्वरित रद्द केला आहे.