
मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी होणाऱया प्रचंड गर्दीमुळे धोकादायक असणारे पूल अतिवजनाने कोसळू शकतात. त्यामुळे अशा धोकादायक पुलांवर मिरवणूक थांबवू नका, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. याबाबत 12 पुलांची यादीच पालिकेने जाहीर केली आहे. यामध्ये पालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 पूल धोकादायक पुलांचा समावेश आहे.
पालिकेकडून धोकादायक पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांनी श्रीगणेशाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत पालिका व मुंबई पोलीस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱया सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या पुलांवर लाऊडस्पीकर लावून नाचगाणी करू नयेत. उत्सवाचा आनंद पुलावरून खाली उतरल्यावर घ्यावा आणि पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन पालिकेने केले.
धोकादायकमध्ये या पुलांचा समावेश…
मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड रेल्वे उड्डाणपूल, चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपूल, भायखळा रेल्वे उड्डाणपुलावरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे उड्डाणपूल, सँडहर्स्ट रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅण्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅण्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनेडी रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅण्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी–क@रोल रेल्वे उड्डाणपूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे उड्डाणपुलाचा समावेश आहे.