
‘मुंबईचा राजा’ अर्थात गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा उत्सवाचे ९९ वे वर्ष साजरे करत आहे. यंदा हे मंडळ महाराष्ट्राची समृद्ध संतपरंपरा, त्यांचा अलोट महिमा आणि पंढरपूरच्या वारीचे विहंगम दर्शन घडवणार आहे. या वर्षीच्या देखाव्यातील मुख्य आकर्षण म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचा अतिशय भव्य प्रसंग दर्शवणारा सुमारे ५० फुटांचा अधांतरी फिरणारा हलता गरुड असणार आहे. त्यामागे अलौकिक वैकुंठ आणि तुकोबांचे ग्रंथ इंद्रायणी नदीतून पुन्हा वर आल्याचा ऐतिहासिक व भक्तिमय प्रसंग अत्यंत नयनरम्य रीतीने साकारला जाणार आहे.
दरवर्षी ‘मुंबईचा राजा’ मंडळातर्फे प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांची प्रतिकृती उभारली जाते. महाराष्ट्राची भूमी पावन करणाऱ्या ज्ञानोबा-तुकोबांपासून ते विविध संतांच्या प्रासादिक वाणीचा, अभंगांचा आणि त्यांच्या जीवनपटाचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या हेतूने यंदा ‘संतांची परंपरा’ ही थीम निवडली आहे. या देखाव्यात विविध संतांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग थेट जिवंत केले जाणार आहेत. यात संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत गोरोबा कुंभार यांसारख्या थोर संतांच्या जीवनपटावर आधारित चलचित्रे पाहायला मिळतील. पर्यावरणपूरक उत्सवाच्या बाबतीत मंडळाने नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली आहे. सजावटीमध्ये पीओपीचा वापर पूर्णपणे टाळल्याचे, सरचिटणीस स्वप्नील परब यांनी सांगितले.
डिजिटल माध्यमातून प्रसार
मंडपातील देखाव्यासोबतच ‘यूट्यूब’च्या माध्यमातून ‘छोटा वारकरी’ या विशेष सेगमेंटद्वारे वारी आणि संतांचे महत्त्व डिजिटल युगात लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे. ९९ व्या वर्षात पदार्पण करताना गणेशगल्लीचा हा उपक्रम भक्ती, संस्कृती आणि समृद्ध परंपरेचा सुरेख संगम असल्याचे मंडळाचे अध्यक्ष-नगरसेवक किरण तावडे यांनी सांगितले.





























































