
कधी कधी विजय हा एकाच फटक्यात मिळत नाही. तो चार वेळा दार ठोठावल्यावरच दरवाजा उघडतो. शरीरसौष्ठवाच्या ‘मसल्स’स्टेजवर अशीच कथा घडली ती बॉडी वर्कशॉप जिमच्या गणेश पेडामकरची. तीन प्रयत्नांत हातातून निसटलेल्या किताबाला अखेर चौथ्या प्रयत्नात त्याने गवसणी घातली आणि मानाच्या प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’च्या मुकुटावर आपले नाव कोरले. महिलांच्या गटात रेखा शिंदेने आपले वर्चस्व कायम राखत अव्वल स्थान पटकावले.
मालाड येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यानातील मंच त्या दिवशी स्नायूंच्या उत्सवाने उजळून निघाला होता. ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’च्या अंतिम फेरीत आठ गटविजेते स्टेजवर उभे ठाकले तेव्हा वातावरणात जणू मसल्सचा गडगडाट घुमू लागला. या फेरीत गणेश पेडामकर, मनीष वाघेला, अक्षय खोत आणि चेतन नाईक यांच्याकडे प्रेक्षकांचे डोळे खिळले होते, पण पेडामकरचा आखीवरेखीव देहबांधा, स्नायूंचे संतुलित आकार आणि आत्मविश्वासपूर्ण पोझिंग यांनी परीक्षकांना अक्षरशः प्रभावित केले. शेवटी त्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ‘मुंबई श्री’च्या किताबावर शिक्कामोर्तब केले आणि आपल्या या यशाचे श्रेय आपला भाऊ अनिकेत माने आणि भावी पत्नी मंजरी हाटे यांनी घेतलेल्या कष्टाला दिले.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने ही मानाची स्पर्धा उत्साहात पार पडली. पारितोषिक वितरण सोहळ्यास माजी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार अतुल भातखळकर, नगरसेवक सिद्धांत शर्मा, विजय भोसले, अजय खानविलकर, राजेश सावंत, किट्टी फनसेका, विशाल परब, सुनील शेगडे, ‘भारत श्री’ शाम रहाटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘मुंबई श्री’चा निकाल
55 किलो : 1. राजेश तारवे (शाहू जिम), 2. किसन यादव (ए.व्ही. फिटनेस), 3. निशांत नांदीवडेकर (श्री दत्तगुरू जिम).
60 किलो : 1. प्रशांत घोलम (आर्यन पॅराडाईज), 2. अक्षय गवाणे (पावर फिटनेस), 3. हसिबुल शेख (परब फिटनेस).
65 किलो : 1. निखिल सावंत (आय.क्यू. फिटनेस), 2. संदीप सावळे (परब फिटनेस), 3. अरुण पाटील (सालम जिम).
70 किलो : 1. विशाल धावडे (बालमित्र जिम), 2. संजय जाधव (आर.एम. भट), 3. महेश पवार (सालम फिटनेस).
75 किलो : 1. मनीष वाघेला (बालमित्र जिम), 2. विश्वंभर राऊळ (माँसाहेब जिम), 3. सुरेंद्र नाईक (परब फिटनेस).
80 किलो : 1. गणेश पेडामकर (बॉडी वर्कशॉप), 2. सिद्धांत यादव (आर्यन पॅराडाईज), 3. राजेंद्र जाधव (परब फिटनेस).
85 किलो : 1. अक्षय खोत (परब फिटनेस), 2. अमित साटम (माँसाहेब जिम), 3. ओमकार कळके (फिटनेस पॉइंट जिम).
85 किलो वरील : 1. चेतन नाईक (परब फिटनेस),
2. अविनाश शिंदे (परब फिटनेस), 3. क्षितिज साळुंके (आर्यन पॅराडाईज).
मेन्स फिजिक 170 सेमी : 1. अनिकेत चव्हाण (प्राईम फिटनेस), 2. अनिश शिंदे (डीएनए 360 फिटनेस),
3. रोहन भोसले (बी. फिटनेस).
मेन्स फिजिक 170 सेमी वरील :
- नीलेश गुरव (माँसाहेब जिम), 2. रेहमत खान (आदियंश जिम), 3. असिफ खान (बॉडी वर्कशॉप).
महिला शरीरसौष्ठव : 1. रेखा शिंदे (बॉडी फिटनेस), 2. दुर्गा कुमारी (परब फिटनेस), 3. लविना नरोन्हा (आय.क्यू. फिटनेस).
किताब विजेता : गणेश पेडामकर (बॉडी वर्कशॉप),
उपविजेता : मनीष वाघेला (बालमित्र जिम).




























































