बाप्पाच्या उत्सवात मंडळांपुढे महागाईचे विघ्न! देणग्या घटल्या; जाहीराती, वर्गणी मिळेना

<<< देवेंद्र भगत

सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आला असल्याने उत्सवाच्या तयारीची प्रचंड धावपळ सुरू असताना वाढलेली महागाई आणि आर्थिक चणचणीमुळे बाप्पाच्या उत्सवात महागाईचे विघ्न उभे ठाकले आहे. शाडू, ‘पीओपी’, जागेचे भाडे, कारागिरांच्या मजुरीसह सजावटीचे साहित्य, सजावट खर्च, लायटिंगचे दरही वाढले आहेत. शिवाय लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठत व्यक्तींकडून आता डिजिटल प्रसिद्धीला प्राधान्य दिले जात असल्याने बॅनर, जाहिरातींच्या माध्यमातून मंडळांना मिळणारा आर्थिक हातभारही बंद झाल्याने विशेषतः छोट्या मंडळांना उत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने मुंबईभरातील मंडळांकडून मंडप डेकोरेशनला सुरुवात झाली आहे. मोठ्या मंडळांकडून चलचित्रे, सामाजिक विषयावर मोठा खर्च करून सजावट करण्यात येत आहे, मात्र या वर्षी वाढलेल्या महागाईमुळे लहान मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंडळांच्या मूर्ती सुमारे 10 फुटांपासून 21-22 फुटांपर्यंत असतात. या मूर्तींच्या किमती एक ते दीड लाखापर्यंत असतात. महागाई वाढल्यामुळेच मूर्तीच्या किमती वाढल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे मुंबईत सध्या निवडून आलेले नगरसेवक नसल्याने महत्त्वाचा देणगीचा मार्ग बंद झाल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.

गणेशमूर्ती साकारताना सुरुवातीच्या कामापासून सुमारे दहा प्रकारच्या कामासाठी दहा प्रकारचे मजूर लागतात. त्यांची दिवसाची मजुरी पंधराशे रुपयांपर्यंत गेली आहे. वाढत्या महागाईमुळे ही मजुरी 30 टक्क्यांपर्यंत वाढली असून 20 ते 21 फुटांपर्यंतच्या मूर्तीसाठी लागणाऱया साहित्याच्या किमतीही वाढून एक ते दीड लाखांपर्यंत गेल्या आहेत. वाढलेल्या महागाईचा हा फटका आहे, असे मूर्तिकार राजन झाड यांनी सांगितले.

पूर्वी झोपडपट्ट्या आणि इमारतीमधील प्रत्येक कुटुंबाकडून वर्गणी मिळाल्याने 20 हजारांपर्यंतची रक्कम एका सोसायटीतून मिळायची. दुकानदारही प्रत्येकी स्वतंत्र वर्गणी द्यायचे, मात्र आता सोसायट्यांच्या कमिटीकडून एक ते दोन हजारांची वर्गणी मिळते, दुकानदारांच्या व्यापारी संघटनाही एकच वर्गणी देत असल्याने मंडळांच्या ‘उत्सवाचे गणित’च बिघडले आहे, असे पारशीवाडी गणेशोत्सव मंडळाचे ओमकार सावंत म्हणाले.

मूर्तीची किंमत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढली असून डेकोरेशनचे मटेरियल, डेकोरेशन करणाऱ्यांची मजुरी, लायटिंग चार्ज वाढले आहेत. वैयक्तिक मिळणारी वर्गणी एक तर तुटपुंजी मिळत असून काही जणांकडून वर्गणी देण्यास थेट नकारही देण्यात येत आहे, तर डिजिटल अॅडमुळे बॅनरच्या माध्यमातून मिळणारे जाहिरात शुल्कही बंद झाल्याने मंडळांना फटका बसला आहे, अशी खंत मिठानगरचा राजा मंडळाचे ऋषी पालकर यांनी व्यक्त केली.