गणेशभक्तांना खूशखबर! कोकण रेल्वेच्या गाडय़ा यंदा वेळेवर धावणार

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम, त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी याची कोकण रेल्वे प्रशासनाला जाणीव आहे. यामुळे गणेशभक्तांना आपल्या गावी वेळेवर पोहचविण्यासाठी कोकण रेल्वेमार्गावरील नियमित गाडय़ांसह 202 अतिरिक्त गाडय़ांना नियोजित स्थानकावर वेळेवर पोहचविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहील असा ठाम विश्वास कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी ‘सामना’शी बोलताना व्यक्त केला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे पनवेल ते झाराप या मार्गावर लाखो खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजविणे शासनाला अशक्य आहे. यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होणार आहे. परिणामी यंदा बहुतांश चाकरमानी कोकण रेल्वेतूनच प्रवास करून आपले नियोजित ठिकाण गाठणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता ‘सामना’शी बोलत होते. ते म्हणाले की, आधीच आम्ही क्षमतेपेक्षा 40 टक्के गाडय़ा या मार्गावर चालवीत आहोत. त्यातच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी आम्ही 126 अतिरिक्त गाडय़ा सोडीत आहोत. त्यामुळे मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक गाडय़ा धावणार आहेत. त्यामुळेच दरवर्षी या गाडय़ांना नियोजित ठिकाणी पोहचण्यास अधिक वेळ लागतो. पण यंदा तसे होणार नाही. सर्वच गाडय़ा वेळेवर पोहचतील यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करणार आहे सांगून गुप्ता म्हणाले की, गेल्या 20 वर्षांत कोकण रेल्वेने बरीच प्रगती केली आहे. आज कोकण रेल्वेमार्गावर रोज 70हून अधिक गाडय़ा धावत आहेत. दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती साधली जात आहे. प्रवाशांना वेळेवर पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत

यावेळीही कोकण रेल्वेने मागील वर्षाच्या यंत्रणेत थोडासा बदल केला आहे. मागील वर्षी गणेशोत्सवात कोकण रेल्वेने 250 गाडय़ा सोडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे नियोजन योग्यप्रकारे करता आले नाही. परिणामी गाडय़ांना नियोजित ठिकाणी पोहचण्यास उशीर लागला. म्हणूनच यंदा कोकण रेल्वेने 202 गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ प्रवासी कमी जाणार नाहीत. कारण या 202 गाडय़ांच्या मागील वर्षाइतकेच डबे जोडण्यात आले आहेत. यामुळे प्रवासी तितकेच जाणार पण गाडय़ांची संख्या कमी असल्याने त्या वेळेवर धावतील, असेही गुप्ता यांनी सांगितले.