मंडप कारवाईमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास पालिका प्रशासन जबाबदार

सामना ऑनलाईन, मुंबई

पालिकेने परवानगी नाकारलेल्या मंडपांवर  पोलिसांची कुमक न घेता मनमानीपणे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा वेळी नागरिकांचा संताप होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. तांत्रिक कारणांमुळे परवानगी नाकारून सुरू असलेल्या कारवाईविरोधात स्थायी समितीत आज शिवसेनेसह सर्वपक्षीय आक्रमक झाले.

राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा मांडून परवानगी नाकारलेल्या मंडळांना ऑफलाइन परवानगी देण्याची मागणी केली. पालिकेने या वर्षीच सुरू केलेल्या ऑनलाइन पद्धतीमधील गोंधळामुळेच ही स्थिती ओढावल्याचे ‘सपा’चे गटनेते रईस शेख म्हणाले. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी किचकट प्रक्रियेमुळेच मंडप परवानग्यांचा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले. यावेळी सदस्यांच्या संताप लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले की, ‘अनेक वर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱया मंडळांना जाचक अटी लावू नयेत. कोर्टाच्या आदेशाचे कारण देत मनमानी न करता प्रथा-परंपरा आणि संस्कृती लक्षात घेऊन काम करावे. अन्यथा भक्तांच्या संतापाचा भडका उडाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.  याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील.’