विघ्नहर्ता श्री गणेशाचे काल (शनिवारी) मोठय़ा उत्साहात घरोघरी आगमन झाले. यावेळी राजारामपुरीसह अन्य ठिकाणी निघालेल्या आगमन मिरवणुकांमध्ये पोलिसांच्या आदेशाला न जुमानता साऊंड सिस्टीमसह लेजरचा अमर्यादित वापर झाला. त्यामुळे मिरवणूक बघायला आलेल्यांच्या कानाला दडे बसल्याचे आणि डोकं बधिर झाल्याचे दिसून आले. लहान मुलांसह वृद्धांनाही याचा त्रास झाला. लेजरमुळे उचगाव परिसरात एका तरुणाच्या, तर बंदोबस्तावरील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. दोघांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, ध्वनी आणि लेजरच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 30हून अधिक मंडळांवर पोलिसांनीही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
डॉल्बीचा दणदणाट आणि विद्युतरोषणाईसाठी आसमंत व्यापून टाकणाऱ्या प्रखर लेजर शोच्या झगमगाटात शनिवारी शहरासह परिसरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या ‘श्रीं’च्या आगमन मिरवणुका निघाल्या. रात्री 12पर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. ध्वनीची मर्यादेपेक्षा जास्त पातळी होती, तर लेजरचा झगमगाटही प्रखर असल्याने मिरवणूक पाहायला आलेल्यांच्या कानाला दडे आणि डोकं बधिर अशी अवस्था झाली. त्यामुळे अनेक सुज्ञ आबालवृद्धांनी मिरवणुकीतून काढता पाय घेतला. घरी गेल्यावर यातील काहींना त्रास जाणवू लागला. करवीर तालुक्यातील उचगावच्या मणेरमळा परिसरातील आदित्य पांडुरंग बोडके या 21 वर्षांच्या तरुणाला लेजरमुळे तासाभरात डोळ्याला जळजळ होऊन पाणी येऊ लागले. आदित्यला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डोळ्याच्या आत रक्तस्राव झाल्याचे समोर आले. आता या तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय टेंबलाईवाडी येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले हवालदार युवराज पाटील यांच्याही उजव्या डोळ्याला सूज येऊन दुखापत झाल्याने त्यांनाही खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
धोकादायक लेसरवर कायमची बंदी हवी – डॉ. चिंतामणी खरे
दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका अभ्यासात गणेशोत्सवाच्या काळात कोल्हापूर जिह्यात लेजरमुळे डोळ्यांना इजा झालेल्या 70 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. या धोक्यापासून बरे होणाऱ्यांची संख्या जरी चांगली असली, तरी डोळ्यांच्या रेटिनामध्ये रक्तस्राव झालेले रुग्ण अधिक होते. गतवर्षीही 40 रुग्णांना धोकादायक लेजरचा त्रास झाला. यंदा लेजर किरणांमध्ये आधुनिकता आणून त्याची तीव्रता वाढविल्यामुळे मानवी डोळ्यांना या किरणांचा सर्वाधिक धोका आहे. लेजर किरणांची तीव्रता अधिक असल्यामुळे रेटिनाला सर्वाधिक धोका असून, अशा मिरवणुका टाळणे वा या किरणांकडे बघूच नये, अशी दक्षता घ्यायला हवी. शासनाने या धोकादायक लेजर किरणांच्या वापरावर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी येथील नेत्रविकारतज्ञ डॉ. चिंतामणी खरे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना केली.
30हून अधिक मंडळांवर कारवाई
साऊंड सिस्टिमच्या ध्वनिमर्यादेसह प्रखर लेसरबाबत पोलिसांनी राजारामपुरीसह अन्य परिसरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सूचना दिल्या होत्या. तसेच परिसरातील आजारी व्यक्तींसह मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या वृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते; पण पोलिसांच्या आवाहनाला काही मंडळांनी हरताळ फासला. काही मंडळांच्या हेकेखोरपणामुळे साऊंड सिस्टीमच्या मिरवणुका दणक्यात सुरू होत्या. आरोग्याला त्रास होऊ लागल्याने पोलिसांना रात्री उशिरा नागरिकांना मिरवणुकीतून बाहेर काढावे लागले. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या 31 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्ष, पदाधिकारी व साऊंड सिस्टिमचे मालक, तसेच ऑपरेटर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.