शेवगाव दरोड्यातील आरोपींची टोळी 48 तासात जेरबंद; 1 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त

शेवगाव येथे दरोड्यातील आरोपींची जोडी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. या कारवाईत 1 लाख 85 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली. अवघ्या 48 तासात स्थानिक गुन्हे शाखेने टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दिपक बाबासाहेब जरांगे (रा. मारवाडी गल्ली, ता. शेवगाव) शनिवारी (दि. 8 रोजी) कुटूंबियासह घरात झोपलेले असताना अनोळखी 6 इसमांनी घरात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवत लाथाबुक्यांनी मारहाण केली. घरातील 1 लाख 8 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली. तसेच निवृत्ती कारभारी वाणी (वय 66, रा. सातपुते गल्ली, ता. शेवगाव) यांच्या घरातही चोरी करुन 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटननास्थळी जात पाहणी केली. तेथे कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींची काहीएक माहिती मिळाली नाही. त्यामुळे पथक शेवगाव परिसरात फिरुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली. अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले (रा. गोंडेगांव, ता. नेवासा) याने त्याचे इतर साथीदारांसह गुन्हा केला असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी आहे. पथक त्याठिकाणी पोहचल्यावर 2 संशयित उभे असलेले पथकाला दिसले. त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले (वय 40), रोहन अनिल ऊर्फ यासीनखॉ भोसले (वय 19, दोन्ही रा. गोंडेगांव, ता. शेवगाव) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांचे इतर साथीदार अमर दत्तु पवार, कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले, दिपक इंदर भोसले (सर्व रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) व सुनिल बाबाखॉ भोसले (रा. गोंडेगांव, ता. नेवासा) यांच्यासोबत मिळून 2-3 दिवसांपुर्वी शेवगांव परिसरात व 1 महिन्यापुर्वी चांदगांव, उस्थळ दुमाला( ता. नेवासा) परिसरातील मेडीकल दुकान फोडुन रोख रक्कम व पल्सर मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. इतर साथीदारांचा शोध घेतला असता, आरोपी अमर दत्तु पवार (वय 30), कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले (वय 21 दोन्ही रा. नेवासा फाटा, ता. नेवासा), सुनिल बाबाखॉ भोसले (वय 21, रा. गोंडेगांव, ता. नेवासा) सापडले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले. आरोपी दिपक इंदर भोसले (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा ) हा फरार आहे.

आरोपींकडून 1 लाख 85 हजार 200 रुपये किंमतीचे 13 ग्रॅम वजनाचे दागिने, रोख रक्कम व 1 चाकु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुद्ध नगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, आर्म ऍ़क्ट व दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत.आरोपी अमर दत्तु पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, आर्म ऍ़क्ट, दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 14 गुन्हे दाखल आहेत. आरोपी रोहन अनिल ऊर्फ यासीनखॉ भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोड्याचा 1 गंभीर गुन्हा दाखल आहे.आरोपी सुनिल बाबाखॉ भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन येथे चोरीचा 1 गुन्हा दाखल आहे.