ठाणेकरांच्या गॅसवर चोरट्यांचा डल्ला; दोन टँकरसह 58 सिलिंडर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणेकरांच्या गॅसवर चोरटे डल्ला टाकत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याचा पर्दाफाश शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने केला आहे. या पथकाने कळवा, खारेगाव जुना टोलनाका येथे अचानक धाड टाकून दोन टँकरसह ५८ सिलिंडर जप्त केले आहेत. तसेच टँकरचालक व मालकावर गुन्हा दाखल केला असून ५० लाखांचा मुद्देमाल पकडला आहे.

पुरवठा विभागाचे अधिकारी चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनखाली गणेश बेल्लाळे यांच्या फिरत्या पथकाने कळवा, खारेगाव जुना टोलनाका येथे अचानक धाड टाकून कारवाई केली. यावेळी टँकरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये अवैधरीत्या गॅस भरत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून टँकरचालक आणि माल क यांच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने ५० लाख १ हजार ५१६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात गॅसने भरलेले २ टँकर व २८ भरलेले व्यावसायिक सिलिंडर तसेच ३० रिकामे व्यावसायिक सिलिंडर आहेत.

या कारवाईत फिरत्या पथकातील शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, दीपेंद्र परूळेकर, राजेश सोरते, अमोल बुरटे, विकास नागदिवे, देवानंद थोरवे, रवींद्र राठोड, अरुण काते व राहुल इंगळे, ‘फ’ परिमंडळाचे सहाय्यक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, शिधावाटप कार्यालय ४१ ‘फ’ ठाणे कार्यालयातील शिधावाटप अधिकारी सुभाष डुंबरे, महेश कुसमुडे, संतोष गुरव आदींनी भाग घेतला.