
लग्नाच्या नावाखाली विश्वास संपादन करून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱया टोळीचा कोपरगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईत तीन तरुणींना अटक करण्यात आली आहे, तर दोन मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथील फिर्यादीस 21 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून आरोपींनी संगनमताने दोन लाख 29 हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच सोने-चांदीचे दागिने लुटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
याप्रकरणी कशीष सुकदेव भालेराव, भ्रमता सुकदेव भालेराव, भूमी किरण निकम (सर्व रा. नाशिक) या तीन तरुणींना अटक करण्यात आली आहे. तर अशोक तान्हाजी काळे व बनिता अशोक काळे (रा. आंगणगाव, ता. येवला) हे दोघे अद्याप फरार आहेत. तसेच गोकुळ चिदा पानकर याचाही गुह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी आडगाव नाका (नाशिक) परिसरात सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुह्याची कबुली देत खोटे लग्न लावून फसवणूक केल्याचे मान्य केले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.



























































