कोलकात्यातील बलात्कार नव्हे तर गँगरेप; शवविच्छेदनातून धक्कादायक माहिती समोर

कोलकातामधील आरजी मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार हा केवळ बलात्कार नसून तो सामूहिक बलात्कार आहे, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पीडितेवर एका व्यक्तीने बलात्कार केला आहे, असे सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी म्हटले होते. परंतु पोलिसांचा हा दावा शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरने खोडून काढला आहे.

सुवर्ण गोस्वामी यांनी शवविच्छेदन केले असून पीडितेच्या शरीरात 150 मिलीग्रॅम सिमन मिळाले आहे. हे सिमन एका व्यक्तीचे नाही. ट्रेनी डॉक्टरवर ज्यांनी बलात्कार केला आहे त्यात एकापेक्षा जास्त लोक सहभागी असू शकतात, असे या शवविच्छेदनातून समोर आले आहे. त्यामुळे कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कोलकाता पोलिसांनी बलात्कार आणि हत्येनंतर 24 तासांत आरोपी संजय रॉय (35) याला अटक केली होती.

हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण देश स्तब्ध – राहुल गांधी 

कोलकातामधील कनिष्ठ डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. या घटनेमुळे डॉक्टर्स आणि महिलांना असुरक्षित वाटत आहे. बलात्कार पीडितेला न्याय देण्याऐवजी या घटनेत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. आरोपीला वाचवत असल्यामुळे हॉस्पिटल आणि स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असेही राहुल गांधी यांनी एक्सवर म्हटले आहे.