
प्रसिद्ध चिंचपोकळी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या गणरायासह मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा रविवारी मंडपात दाखल झाले. रात्रीपासून मुसळधार हजेरी लावलेल्या पावसातही लाखो गणेशभक्तांनी बाप्पाच्या आगमन सोहळ्याला गर्दी केली. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. बहुतांश मंडळांचे बाप्पा दाखल झाल्यामुळे दहा दिवस आधीच लालबाग, परळ परिसरात गणेशोत्सवाचा माहोल तयार झाला आहे.
समन्वय समिती, मंडळ कार्यकर्त्यांची तत्परता
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील लाखो गणेशभक्तांची गर्दी उसळण्याची शक्यता गृहीत धरुन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती तसेच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेतली. गर्दीचा वाहतुकीला फटका बसू नये, रुग्णवाहिकांना मोकळी वाट करुन देणे यासाठी कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवली.
गणेशोत्सवाला अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने रविवारी अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंतामणीचे देखणे रुप नजरेत साठवण्यासाठी गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. परळच्या कार्यशाळेतून दुपारी 12 वाजता चिंतामणी गणरायाने मंडपाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. जागोजागी उभी राहिलेली डझनभरहून अधिक ढोल-ताशा पथके, लेझिम पथके, भगवे झेंडे हाती घेऊन गणरायाला सलामी देणारी पथके, दहीहंडी पथके आदींच्या लवाजम्यासह गणरायाची स्वारी मंडपाच्या दिशेने निघाली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीमय वातावरणात हजारो तरुण-तरुणींनी बाप्पाचा जयघोष सुरू केला. चिंतामणीसह परळचा राजा, उमरखाडीचा राजा, घाटकोपर पश्चिमेचा राजा व इतर मानाचे गणपती वाजतगाजत मंडपात दाखल झाले.
कडेकोट पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्हींतून पाळत
मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक मंडळांचे बाप्पा एकाचवेळी कार्यशाळांतून बाहेर पडणार होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी परळ, करी रोड, लालबाग, दादर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीची संधी साधून समाजकंटकांकडून गैरप्रकार केले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या गर्दीत साध्या वेशात पोलीस तैनात होते. यावेळी महिला सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली. तसेच जागोजागी सीसीटीव्ही पॅमेरे बसवून त्याद्वारे गर्दीवर पाळत ठेवण्यात आली. पोलिसांची विशेष व्हॅन, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची यंत्रणा तसेच सीसीटीव्हींची विशेष व्हॅन असा लवाजमा चिंतामणी गणरायाच्या आगमन मिरवणुकीत सज्ज होता. त्यामुळे लाखो गणेशभक्तांची गर्दी असूनही शांततेत आणि शिस्तबद्धरीत्या आगमन सोहळा पार पडला.