Ganpati Bappa Morya : डोळ्यांवर पट्टी बांधून 25 सेकंदांत रेखाटते बाप्पाचे चित्र, वाराणसीतील अनोखा गणेशभक्त

महाराष्ट्रासह जगभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. अशातच विश्वनाथांच्या काशी नगरीत म्हणजेच वाराणसीत एका अनोख्या गणेशभक्ताची चर्चा आहे. गणरायाचा हा भक्त डोळ्यांवर पट्टी बांधून अवघ्या 25 सेकंदांत बाप्पाचे चित्र काढतो. विजय असे या कलावंतांचे नाव आहे. खरं तर विजय हा मूर्तिकार कुटुंबातील आहे. लहानपणापासून विजय गणरायाच्या भक्तीत लीन होऊन चित्र काढण्याचा अभ्यास करतोय. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

डोळ्यांवर पट्टी बांधून चित्र काढण्याची प्रेरणा पुठून मिळाली, असे विचारताच विजय अन्नपूर्णा देवीचे नाव घेतो. ‘काशी म्हणजे माँ अन्नपूर्णाचे शहर असे मानतात. म्हणून अन्नपूर्णा देवीला प्रेरणा मानून मी कला जोपासली. गणराय म्हणजे आराध्य दैवत. त्याची पूजा करून कोणत्याही कामाची सुरुवात होते. म्हणून मी बाप्पाची आराधना करत बाप्पाचे चित्र काढायला सुरुवात केली. दिवसाला मी गणरायाची 13-14 पेटिंग्ज करतो’ असे विजयने सांगितले.

पाच लाख पेटिंग्ज साकारली

विजयने श्रीगणेशाची पाच लाखांहून अधिक पेटिंग्ज साकारली आहेत. वेगवेगळ्या रूपांत त्याने बाप्पा साकारलाय. शनिवारपासून गणेशोत्सव सुरू होतोय. यानिमित्ताने बाप्पाची अनोखी रूपे साकारण्यासाठी विजय सज्ज झालाय. डोळ्यांवर पट्टी बांधून गणरायाचे पेटिंग करण्यापूर्वी विजय गणरायाची मनोमन आराधना करतो आणि मंत्रोच्चारात पेटिंग करायला सुरुवात करतो. 30 सेंकदांत लंबोदराचे पेटिंग करण्याचा त्याचा विक्रम आहे. डोळे बंद करून 26 तास वाराणसीत, तर 51 तास मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात त्याने पॅनव्हासवर गणरायाचे चित्र साकारले होते. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.