कचरा व्यवस्थापन करा, मालमत्ता करात पाच टक्के सवलत मिळवा!

509

मुंबईतील सोसायटय़ांना कचरा व्यवस्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला सोसायटय़ांचा प्रतिसाद वाढावा यासाठी पालिकेने कचरा व्यवस्थापन, प्रक्रिया आणि मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 17 जानेवारी रोजी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडियाच्या एम्पेरेर सभागृहात प्रदर्शन आयोजित केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायटय़ांना कचऱ्याचे क्यकस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  कचराव्यवस्थापन मोठय़ा प्रमाणावर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने कचऱ्याचे कर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंका पर्जन्य जल संधारण योजना राबविणाऱ्या सोसायटय़ांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत अशी योजनाही राबवण्यात येत आहे. शिवाय सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरात दिवसाला 50 मेट्रिक टन कचरा विल्हेवाटीची क्षमता असणाऱ्या केंद्र सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना दीड लाखाचे बक्षीस

‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत पालिकेच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत मुंबईत हॉटेल्स, शाळा, रुग्णालये, सोसायटय़ा आणि मार्केट असोसिएशनच्या ठिकाणी मूल्यांकन केले आहे. यामध्ये विजेत्या ठरलेल्यांना उद्याच्या कार्यक्रमात दीड लाखपार्यंत बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

अनोखा प्लॅस्टिक फॅशन शो ठरणार आकर्षण

प्लॅस्टिकबंदी आणि पुनर्वापराला चालना देण्यासाठी प्रदर्शनादरम्यान अनोख्या ‘प्लॅस्टिक फॅशन शो’चे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराला चालना, प्लॅस्टिकचा नावीन्यपूर्ण पुनर्वापर अशा गोष्टी या फॅशन शोमधून दाखवल्या जाणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या