
गणरायापाठोपाठ माहेरवाशीण गौराईचे रविवारी आगमन होणार आहे. घरोघरी लाडक्या गौराईच्या स्वागताची तयारी सुरू आहे. गौराईच्या मुखवटय़ांपासून ते साडय़ा तसेच गौरीचे दागिने, मिष्टान्न, नैवेद्याच्या खरेदीची मार्पेटमध्ये लगबग आहे.
गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर महिला गौराईच्या खरेदीला बाहेर पडलेल्या दिसून येत आहेत. बाजारात गौरी तयार करण्यासाठी लागणारे स्टँड, मुखवटा, साडी, दागिने, पाऊलजोड आणि डेकोरेशनसाठी लागणाऱया दिव्याचा माळा उपलब्ध आहेत. सध्या बाजारात गौरीचे विविध प्रकारचे सुंदर मुखवटे उपलब्ध आहेत. दादर येथील ‘साडीघर’चे मालक गौतम राऊत म्हणाले, ‘लाकडू, फायबर, पीओपी, प्लॅस्टिक अशा काही प्रकारचे मुखवटे आहेत. हे मुखवटे 350 रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर लाकडी मुखवटय़ांसह पूर्ण गौराईदेखील आहे. फायबरचे मुखवटे जास्त काळ टिकतात. त्यांनाही अधिक मागणी आहे.’
रेडिमेड साडय़ांना पसंती
गौराईला सहा वारी–नऊ वारी साडय़ा नेसवल्या जातात. हल्लीच्या काळात रेडिमेड साडय़ांचीही खरेदी होते. गौराईसाठी रेडिमेड साडय़ा 850 रुपयांपासूनच्या किंमतीला उपलब्ध आहेत. तुमच्या गौरींचा आकार आणि तुम्ही कोणते कापड निवडता यावर किमती अबलंबून असतात.
पारंपरिक दागिन्यांची खरेदी
गौरीसाठी पारंपरिक दागिन्यांची खरेदी करताना महिला दिसत आहेत. लक्ष्मीहार, ठुशी, बोरमाळ, मंगळसूत्र, कमरपट्टा, आकर्षक नथी, याशिवाय मोत्यांच्या दागिन्यांनाही मागणी आहे. आधुनिक पद्धतीने खडय़ांचे दागिने, ऑक्साईड या प्रकाराकडे ग्राहकांचा ओढा दिसून येत आहे. अगदी 100 रुपयांपासून हे दागिने उपलब्ध आहेत.
पीओपी मुखवटे…………………. 350 रुपयांपासून 2450 रुपये
फायबरच्या गौरी………………… 2500 ते 4000 रुपये
फायबरची उभी गौरी……………. 7500 तो 16500 रुपयांपर्यंत
प्लॅस्टिकच्या गौरी………………… 1600 रुपयांपासून
गौरीसाठी स्टँड…………………….. 300 रुपयांपासून
पाऊलजोड………………………….. 350 रुपयांपासून आहेत