
कॅनडामध्ये लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे टुड्रो सरकार आता एकापेक्षा एक मोठ्या घोषणा करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांनी अस्थायी परदेशी कामगारांच्या संख्येला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी कमी पगाराच्या, कंत्राटी परदेशी कामगारांची संख्या कमी करण्याची योजना जाहीर केली आहे. टुड्रो यांच्या निर्णयाचा परिणाम थेट हिंदुस्थानींवर होणार आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांनी लवकरच होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही मोठे निर्णय घेतले. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे, कॅनडामध्ये कंत्राटी नोकऱ्या करणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या कमी करण्याचा. या निर्णयामुळे कमी पगारावर काम करणाऱ्या लाखो परदेशी लोकांवर परिणाम होईल, ज्यात हिंदुस्थानींची संख्या मोठी आहे.
टुड्रो सरकारवर होतेय जोरदार टीका
टुड्रो यांच्या या निर्णयाला तज्ञांकडून राजकारणाशी जोडले जात आहे. या निर्णयामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांवर मोठी टीका होत आहे. लोक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अनेक कॅनेडियन ट्विटर युजर्संनी त्यांना आतापर्यंतचे सर्वात वाईट पंतप्रधान म्हणूनदेखील संबोधले आहे.
कोरोनानंतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट
कोरोना महामारीनंतर कामगारांच्या तुटवड्यामुळे टुड्रो सरकारने निर्बंधांमध्ये दिलासा दिला होता. यानंतर कमी पगार असलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. कायमस्वरूपी रहिवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे कॅबिनेट स्ट्रीटमध्ये या विषयावर चर्चा होऊ शकते. कॅनडा सरकार 2024 मध्ये 4 लाख 85 हजार कायमस्वरूपी निवासी, तर 2025 व 2026 मध्ये 5 लाख कायमस्वरूपी निवासींचा स्वीकार करण्याची शक्यता आहे.