जुहू गल्ली आणि वर्सोव्यातून 12 बांगलादेशींना पकडले, घाटकोपर पोलिसांची कारवाई

घाटकोपर पोलिसांनी आज घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरोधात धडक कारवाई केली. अंधेरी येथील जुहू गल्ली आणि वर्सोवा येथे बेकायदेशीरपणे राहणाऱया 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
21 जानेवारी रोजी घाटकोपर पोलिसांनी दोघा बांगलादेशी नागरिकांना पकडले होते. त्यांच्या चौकशीत जुहू गल्ली आणि वर्सोवा येथे आणखी काही बांगलादेशी घुसखोर बेकादेशीरपणे राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रेवण्णा ठेंगळे यांना मिळाली. त्यानुसार ठेंगळे व पथकाने आज दोन्ही ठिकाणी छापेमारी करून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱया 12 बांगलादेशी नागरिकांना पकडले. या सर्वांवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

z बांगलादेशी नागरिकांकडून विविध कंपनीचे मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणुक आयोगाची ओळखपत्र, पारपत्र व अन्य कागदपत्रे मिळाली आहेत.

मानुखुर्दमध्ये चौघांना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट-6 च्या पथकाने मानखुर्द येथे बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई केली. महाराष्ट्र नगर 3 येथील शिवशक्ती चाळीत राहणाऱया चार बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. त्यात दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. महिला अंमलदार अभंग यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रभारी निरीक्षक भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.