आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, खडकी, निरगुडसर, काठापुर, लाखनगाव, देवगाव येथील घोड नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिके जळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. डिंबे धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी मागील 11 मेपासून बंद केले आहे. मात्र धरणात सध्या दोन टक्के पाणी शिल्लक आहे. तसेच डाव्या कालव्याला सहाशे क्युसेसने पाणी सुरू आहे.
आंबेगाव व शिरूर तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या घोड नदीमुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यातही घोड नदी ओसंडून वाहत होती. परंतु, सध्या नदी कोरडी पडण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. गहू, कांदा, फ्लावर, टोमॅटो, ऊस या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. परंतु, नदीपात्रच कोरडे पडण्यास सुरू झाले आहे. त्यामुळे बाबू गेनू जलाशय (डिंभा)धरणातून लवकरात लवकर घोड नदीत पाणी सोडावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. हाता-तोंडाशी आलेले गहू , ऊस, फ्लावर, टोमॅटो हे पीक पाण्याअभावी जळून गेले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पाणी नसल्यामुळे इतर पिकांची देखील अशीच अवस्था आहे.
दरवर्षी उशिरा घोडनदी मधील अडवलेले पाणी संपते. मात्र, यंदा पाण्याची गळती होऊन पाणी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याअभावी नदीचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. डिंबा धरणातून घोड नदीमध्ये पाणी सोडले, तर पीके वाचणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोपे महागड्या दराने विकत घेऊन लावली आहेत.उन्हाची तीव्रता जास्त असल्याने विंधनविहीर व विहिरी यांची पाण्याची पातळी खालावली आहे. घोड नदीमध्ये जर डिंबे धरणातून पाणी सोडले तर त्या पाण्याची बंधाऱ्यामधून गळती होणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे. यासाठी बंधाऱ्याची दुरुस्ती करून नवीन ढापे टाकावेत. यंदा पुन्हा पाणी सुटेल याची शाश्वती नसल्याने संबंधित विभागाने पाण्याची गळती होऊ देऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
जवळे-निरगुडसर या दोन गावा दरम्यान घोडनदीवर 35 लाख रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेल्या बुडीत बंधाऱ्याच्या कामाला गेल्या साडेतीन वर्षापासून ब्रेक लागला आहे. संबंधित विभागाने बुडीत बंधाऱ्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे. या बंद असलेल्या कामाकडे लक्ष घालून हे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची मागणी जवळे ग्रामस्थांनी केली आहे.