
प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचे 100 वर्षांहून अधिक जुने गर्डर्स शनिवारी एका रात्रीत हटवण्यात आले. पश्चिम रेल्वे मार्गावर सहा तासांचा यशस्वी मेगाब्लॉक घेण्यात आला आणि महाकाय व्रेनच्या सहाय्याने सुरक्षितरीत्या पुलाचे जुने गर्डर्स हटवण्याची कामगिरी फत्ते करण्यात आली. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक लोकल फेऱया रद्द करून पूल पाडकामाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला.
112 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी वरळी-शिवडी उन्नत मार्गातील डबलडेकर रोड ओव्हर ब्रीज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ब्रिटिशकालीन पुलाचे पाडकाम केले जात आहे. या प्रकल्पांतर्गत पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील कामाला वेग देण्यात आला. शनिवारी मध्यरात्री 12.30 ते सकाळी 6.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आणि दुसऱया टप्प्यातील 100 वर्षांहून दोन जुने गर्डर्स हटवण्यात आले. प्रचंड वजनाचे असलेले 32 मीटर लांबीचे गर्डर्स हटवण्याचे मोठे आव्हान महारेल आणि पश्चिम रेल्वे प्रशासनापुढे होते. मार्गाची रुंदी कमी असल्यामुळे व्रेन प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेणे कठीण होते. तसेच ब्लॉकच्या कालावधीत ओव्हरहेड वायर व्यवस्थेचे तात्पुरते स्थलांतर करणे हेदेखील एक आव्हान होते. संबंधित सर्व आव्हानांचा सामना करून दोन्ही गर्डर्स हटवण्याची मोहीम फत्ते केली, अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
एक्प्रेस-लोकल सेवेवर परिणाम
‘महारेल’ने यापूर्वीचे काम रात्रीच्या वेळेत तीन तासांचे छोटे ब्लॉक्स घेऊन केले होते. मात्र शनिवारी रात्री सहा तासांचा मोठा ब्लॉक घेतल्यामुळे अनेक लोकल फेऱया रद्द करण्यात आल्या. तसेच एक्प्रेसचे वेळापत्रकही कोलमडले. परिणामी, रात्री उशिराची डय़ुटी करून घरी परतणारी नोकरदार मंडळी आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांची गैरसोय झाली.
मध्य रेल्वेवर मोठे आव्हान
‘महारेल’ने पश्चिम रेल्वेच्या हद्दीत पूल पाडकामाचे दोन टप्पे पूर्ण केले. आता मध्य रेल्वे मार्गावरील शेवटचा टप्पा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. मध्य रेल्वेवर लोकल सेवेबरोबरच मेल-एक्सप्रेस गाडय़ांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. त्या गाडय़ांचे वेळापत्रक सांभाळून मोठमोठे गर्डर्स हटवावे लागणार आहेत.




























































