लग्नाच्या आधी प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीने चीटिंग केली नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका मुलीविरोधात नोंदवलेला फसवणुकीचा गुन्हा रद्द केला. ही मुलगी तिच्या प्रेमसंबंधाबाबत आईवडिलांना सांगू शकत नव्हती. त्यामुळे तिने अॅरेंज मॅरेजला होकार दिला, पण नंतर तिने प्रियकरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ तिने फसवणूक केला, असा होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला उपाध्याय यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला. या मुलीचे लग्नाआधी पळून जाणे अन्यायकारक ठरू शकते, पण ती फसवणूक नव्हती. फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी सुरुवातीपासून तसा हेतू असल्याचे स्पष्ट करावे लागते. या प्रकरणात मुलगी लग्नाच्या दोन दिवस आधी प्रियकरासोबत निघून गेली. तिचे कृत्य फसवणुकीसाठी केले गेले नव्हते, असे खंडपीठाने नमूद केले.
लग्न करण्यासाठी आमिष दाखवले नव्हते
मुलीच्या कुटुंबीयांनी अॅरेंज मॅरेज करण्यासाठी तक्रारदाराला कोणतेही आमिष दाखवले नव्हते. मुलीच्या प्रेमप्रकरणाबद्दल तिच्या कुटुंबीयांना सर्व माहीत होते, असेही तक्रारदाराच्या जबाबात कुठेही नमूद नाही. उलट मुलगी तिच्या प्रियकराबाबत सांगायला घाबरत होती. तसेच लग्नासाठी तक्रारदाराने स्वतःहून खर्च केला होता. कपडे घेतले होते. पत्रिका छापल्या होत्या. यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नव्हती, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कुटुंबाच्या विरोधातील गुन्हाही रद्द
या प्रकरणात मुलीचे आईवडील व भावाविरोधातही फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांच्याविरोधातील गुन्हादेखील न्यायालयाने रद्द केला.
काय आहे प्रकरण…
चीटिंगचा गुन्हा रद्द करण्यासाठी पुणे येथील कुटुंबाने याचिका केली होती. या कुटुंबाने मुलीचा विवाह तक्रारदार मुलासोबत करण्याचे ठरवले होते. लग्नाच्या दागिन्यांपासून सर्व तयारी झाली. सुपारी पह्डण्याचा कार्यक्रम झाला. तीन दिवसांनी लग्न होते. मुलगी अचानक गायब झाली. मुलीचे कुटुंब तक्रारदार मुलाकडे गेले. आमची मुलगी हरवली आहे, असे त्यांनी त्याला सांगितले. तशी पोलिसांत तक्रार करण्यात आली. मात्र ही माझी व माझ्या कुटुंबाची फसवणूक असल्याचा आरोप करत मुलाने पोलिसांत मुलगी व तिच्या कुटुंबाविरोधात गुन्हा नोंदवला होता.