
हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेसमोर जागतिक व्यापार शुल्क म्हणजेच टॅरिफपेक्षाही वायू प्रदूषण हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माजी अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी केले. तसेच त्यांनी जागतिक बँकेच्या अहवालाचा आधार देत सांगितले की, हिंदुस्थानात प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे 17 लाख लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा हिंदुस्थानातील एकूण मृत्यूच्या 18 टक्के आहे.
प्रदूषणामुळे अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान होत आहे. ‘लॅन्सेट काऊंटडाऊन’ (2025) अहवालानुसार वायू प्रदूषणामुळे अकाली गेलेल्या प्राणांचे आर्थिक मूल्य सुमारे 339 अब्ज डॉलर्स इतके आहे. हे प्रमाण हिंदुस्थानच्या एकूण जीडीपीच्या 9.5 टक्के इतके प्रचंड आहे. वायू प्रदूषणामुळे आजारपण वाढते, ज्यामुळे उत्पादक मानवी तास वाया जातात.
गणिती मॉडेलचा आधार
हा 17 लाखांचा आकडा प्रामुख्याने ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या अभ्यासातून समोर आला आहे. मुळात जागतिक बँकेने सुरू केलेल्या या प्रकल्पात उपग्रहाद्वारे मिळवलेली माहिती, लोकसंख्या सर्वेक्षण आणि विविध रोगांची आकडेवारी यांचा वापर करून एक गणिती मॉडेल तयार केले जाते. 2019 च्या अहवालात हिंदुस्थानचा वायुप्रदूषणामुळे होणारा मृत्यूदर 1.67 दशलक्ष (16.7 लाख) इतका नोंदवण्यात आला होता.
स्वच्छ हवा मोहिमेच्या कार्यकर्त्या ज्योती पांडे लावाकरे यांनीही वायूप्रदूषणावर चिंता व्यक्त केली. ‘जेव्हा अर्थव्यवस्था वाढत असते, पण ती वाढ नेब्युलायझर, एअर प्युरिफायर आणि केमोथेरपीच्या विक्रीतून येत असेल, तर आपण चुकीच्या दिशेने जात आहोत,’ असे त्या म्हणाल्या.
बर्फात हरवली वाट
जम्मू-कश्मीरपासून हिमाचल प्रदेशातील पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. सर्वत्र बर्फाची सफेद चादर दिसून येतेय. रेल्वे ट्रकवरही मोठय़ा प्रमाणात बर्फ साठले आहे. पुलवामा जिल्हय़ात बर्फावरून ट्रेन पुढे सरकत आहेत.


























































