
तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानच्या (टीटीडी) तिरुपती बालाजी मंदिरात शुक्रवारी भाविकांसाठी व्हॉट्सअॅप-आधारित फिडबॅक सिस्टम सुरू करण्यात आली. या प्लॅटफॉर्मचा वापर करून भाविक अन्न-प्रसाद (भाविकांसाठी मोफत अन्न), स्वच्छता, लाडू प्रसाद, सामानाच्या खोल्या, एकूण अनुभव आणि इतर गोष्टींबद्दल फिडबॅक शेअर करू शकतात. तिरुमला आणि तिरुपतीला भेट देणाऱ्या भाविकांसाठी फिडबॅक घेण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी नवीन व्हॉट्सअॅप सिस्टम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट पारदर्शकता, सेवा गुणवत्ता आणि भाविकांचे समाधान असे आहे, असे देवस्थानने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. तिरुमला तिरुपतीमधील विविध ठिकाणी ठेवलेले
क्यूआर कोड
स्कॅन करून यात्रेकरू त्यांचे फिडबॅक शेअर करू शकतात. फिडबॅक मजकूर स्वरूपात किंवा व्हिडिओ अपलोडमध्ये शेअर केला जाऊ शकतो, ज्यामध्ये चांगले, सरासरी किंवा चांगले नाही असे रेटिंग दिले जाते, तसेच अतिरिक्त टिप्पण्या आणि व्हिडिओ पोस्ट करण्याची संधीदेखील दिली जाते. तिरुमला तिरुपती देवस्थानचे व्यवस्थापन प्राप्त झालेल्या सर्व अभिप्रायांचा सखोल आढावा घेईल आणि सेवा सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करेल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.