पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरसाठी पॅकेज जाहीर करावे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी

पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी पूर आला आहे. त्यामुळे या राज्यांना पॅकेज जाहीर करावे अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच इथे बचाव कार्यांना गती द्यावी असेही राहुल गांधी म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदीजी, पंजाबमध्ये पुरामुळे भीषण हाहाकार माजला आहे. जम्मू-कश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्येही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशा कठीण काळात तुमचे लक्ष आणि केंद्र सरकारची सक्रिय मदत फारच आवश्यक आहे. हजारो कुटुंबे आपले घर, आपले जीवन आणि आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी झगडत आहेत. या राज्यांसाठी, विशेषतः शेतकऱ्यांसाठी तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे आणि मदत व बचाव कार्यांना गती देण्यात यावी असेही राहुल गांधी म्हणाले.