
जगभरात मेमरी चिपच्या किमतीत वाढ झाल्याने हिंदुस्थानात स्मार्टफोनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेमरी चिपच्या जागतिक तुटवडय़ामुळे स्मार्टफोनच्या किमतीत वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 2026 मध्ये स्मार्टफोनच्या किमतीत 14 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या जगभरात एआय तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत आहे. मोठ्या कंपन्या डेटा सेंटर्स आणि एआय सिस्टिम उभारण्यासाठी मेमरी चिप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्ये वापरल्या जाणाऱ्या डीरॅम व डेटा सेंटर्ससाठी लागणाऱया एचबीएम चिप्सची मागणी प्रचंड वाढली आहे. देशात सध्या 22 कोटी लोक फीचर फोन वापरतात. त्यांना जर स्मार्टफोनवर शिफ्ट व्हायचे असेल तर बजेट आणि महागडे हँडसेट मोठी अडचण निर्माण करत आहेत. मेमरी चिपच्या किमती वाढल्याने फीचर फोन आणि स्मार्टफोनमधील फरक 6 ते 8 हजारांपर्यंत आहे.
4 जी फीचर फोनवरून 4 जी स्मार्टफोनवर अपग्रेड करण्यासाठी 4 हजार रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतात. जर ग्राहकाने 5 जी फोन निवडला, तर हा भार 6 हजार रुपयांपर्यंत वाढतो. मेमरीच्या कमतरतेमुळे किमती वाढल्यास स्मार्टफोन खरेदी करणे आणखी कठीण होईल, असे काऊंटरपॉइंट रिसर्चचे संचालक तरुण पाठक यांनी म्हटले आहे.

























































