
जीएमआर स्पोर्ट्स आणि रग्बी इंडिया यांच्या भागीदारीत ‘रग्बी प्रीमियर लीग’ च्या दुसऱ्या हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा थरार 16 ते 28 जून 2026 दरम्यान हैदराबादमधील गच्चीबौली स्टेडियमवर रंगणार आहे. मागील वर्षी मुंबईत झालेल्या यशस्वी पहिल्या हंगामानंतर, यंदा ही लीग वेगवान ‘रग्बी 7स्’ फॉरमॅटमध्ये पुनरागमन करत आहे. यामध्ये एकूण सहा फ्रँचायझी सहभागी होणार असून हिंदुस्थान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
रग्बी इंडियाचे अध्यक्ष राहुल बोस यांनी या स्पर्धेमुळे चाहत्यांना जागतिक दर्जाचा रग्बी अनुभव आणि उत्कृष्ट प्रक्षेपण पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तेलंगणा सरकारनेही या उपक्रमाचे स्वागत केले असून, यामुळे राज्यातील क्रीडा संस्कृतीला आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.





























































