
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तेलुगु भाषिक राज्यांमध्ये ‘गो बॅक मारवाडी’ हा नारा सध्या जोरात गाजत आहे. या मोहिमेमुळे मारवाडी समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या संख्येने मारवाडी व्यापारी व्यवसाय करतात.
काय आहे प्रकरण?
तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील अमंगल येथे एका वादानंतर ‘गो बॅक मारवाडी’ मोहिमेची सुरुवात झाली. स्थानिक व्यापारी समुदायाने मारवाडी व्यापाऱ्यांविरोधात आवाज उठवला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, मारवाडी व्यापारी त्यांचा व्यवसाय आणि स्वाभिमानाला धक्का पोहोचवत आहेत. तर मारवाडी समाजाचे म्हणणे आहे की, “आमची जन्मभूमी गुजरात किंवा राजस्थान असली, तरी तेलंगणा ही आमची कर्मभूमी आहे. आम्ही येथेच जन्मलो, वाढलो आणि आमच्या आजोबांच्या काळापासून येथे राहतो.
काय आहे वाद?
सिकंदराबादच्या मोंडा मार्केटमध्ये एका मारवाडी व्यापाऱ्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेची निंदा करत ओस्मानिया विद्यापीठाच्या जॉइंट अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष कोथापल्ली तिरुपती यांनी 22 ऑगस्ट रोजी तेलंगणा बंदचे आवाहन केले होते. या बंदला तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रतिसाद मिळाला. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच दरम्यान, कोथापल्ली तिरुपती यांना पोलिसांनी ओस्मानिया विद्यापीठाच्या वसतिगृहातून ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना नल्लाकुंटा पोलीस स्टेशनला हलवण्यात आले. कोथापल्ली तिरुपती यांनीच ‘गो बॅक मारवाडी, ‘गो बॅक गुजराती-राजस्थान’ मोहीम सुरु केली होती. ही मोहीम आता आंध्र प्रदेशातही पसरली आहे.