दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने जिह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हजारो क्यूसेक्स पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला असून, श्रीरामपुंडातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. नदीपात्राजवळील व्यावसायिकांच्या टपऱया सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणसाठय़ात मोठी वाढ झाली. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. गंगापूर धरणातून दुपारी तीन वाजेपर्यंत साडेआठ हजार, दारणातून चौदा हजार, तर नांदुरमधमेश्वर धरणातून बावन्न हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. गंगापूर धरणातील विसर्गामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला पहिल्यांदाच मोठा पूर आला आहे. श्रीरामपुंड परिसरातील व्यावसायिकांच्या टपऱया सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्या आहेत. श्रीराममपुंडावर होणारे पूजाविधी इतरत्र करावे लागत आहेत.
रस्त्यांना तळ्याचे स्वरूप
नाशिक शहरातील प्रत्येक भागात रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दोन दिवसांच्या पावसाने सर्वच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
जिह्यात मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. सुरगाणा येथे शेतात बैल घेऊन गेलेल्या पासष्टवर्षीय वृद्धाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. भगूरमध्ये खड्डय़ात दुचाकी पडल्याने एकाचा मृत्यू झाला. सटाण्यात जुन्या घरांच्या पडझडीमुळे नुकसान झाले.