
नीट पेपर लीकप्रकरणी मोदी सरकारची देशभर नाचक्की झाली असताना घोटाळय़ामागील गुजरात कनेक्शन पुढे आले. गुजरातमधील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज सीबीआयने गोध्रा येथील जय जलाराम शाळेचे मालक दीक्षित पटेल यांची कित्येक तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये वडोदराचे शिक्षण सल्लागार परशुराम रॉय, जय जलाराम शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम शर्मा, शिक्षक तुषार भट्ट आणि विभोर आनंद तसेच आरिफ वोहरा यांचा समावेश आहे. यातील चार जणांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
पंचमहल जिह्यातील गोध्राजवळ असलेल्या जय जलाराम शाळेचे मालक दीक्षित पटेल यांना पहाटे त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. 5 मे रोजी नीट-यूजी परीक्षा झाली होती. सीबीआय आता त्यांच्या कोठडीच्या मागणीसाठी अहमदाबादला घेऊन जाणार असल्याची माहिती सरकारी वकील राकेश ठाकोर यांनी दिली. हे प्रकरण गुजरात सरकारकडून सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे सीबीआयचे पथक दीक्षित पटेल यांना अहमदाबादच्या न्यायालयात सादर करणार असून त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहेत, असे ठाकोर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यामागे 10 लाख घेतले
नीट घोटाळय़ात अटक करण्यात आलेले पटेल हे सहावे आहेत. या सहाजणांनी 27 विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी मदत करण्याचे आमिष दिले होते. त्यासाठी त्यांनी कथितरीत्या प्रत्येकी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहितीही उघड झाली आहे. आठवडाभरापुर्वी तपासाची जबाबदारी घेतल्यानंतर सीबीआयने चार आरोपींची कोठडी मागितली होती. गोधरा जिल्हा न्यायालयाने शर्मा, भट्ट, आनंद आणि वोहरा यांना 2 जुलैपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे.
विद्यार्थ्यांना नीट यूजी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जय जलाराम शाळा परीक्षा केंद्र म्हणून निवडण्यास सांगण्यात आले होते. हे सर्व विद्यार्थी अवैधरीत्या परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यास इच्छुक होते.
जर विद्यार्थ्यांना उत्तर माहीत नसेल तर त्यांनी प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू नये. त्या प्रश्नाचे उत्तर नंतर भौतिकशास्त्राचे शिक्षक भट्ट यांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये लिहिल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे गुजरात पोलिसांनी म्हटले आहे.