गोखले, शीव, विक्रोळी पुलांमुळे मुंबईची वाहतूक कोंडी लवकरच फुटणार, अतिरिक्त आयुक्तांकडून वेगाने काम करण्याचे निर्देश

मुंबई महापालिकेच्या पूल खात्याकडून मुंबईतील विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पुलाची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी पालिकेने पंबर कसली आहे. अंधेरीतील गोपाळपृष्ण गोखले पूल, शीव (सायन) पूल, बेलासिस पूल, कर्नाक पूल, विद्याविहार पूल आणि विक्रोळी पुलांची कामे वेगाने करण्यावर भर दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज अंधेरी येथील गोखले, शीव आणि विक्रोळी पुलांची पाहणी करत कामांचा आढावा घेतला.

मुंबई महापालिकेच्या पूल खात्यामार्फत मुंबईत विविध ठिकाणी पूल उभारणीची कामे सुरू आहेत. प्रमुख पुलांची कामे प्रगतिपथावर असून हे पूल सेवेत आल्यानंतर वाहतूककोंडी फुटून मुंबईकरांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. कर्नाक पूल, विक्रोळी पूल व गोखले पूल या पुलांची कामे खोळंबली असून ही कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करून हे पूल लोकांच्या सेवेत आणण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कामे वेगाने सुरू आहेत. यावेळी प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

31 मे 2026 पर्यंत शीव पुलाचे काम पूर्ण करा!

शीव रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूकडील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या विविध खात्यांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. पादचारी पूल उभारणीत अडथळा ठरणारी बांधकामे हटवणे, सांडपाणी वाहक नलिका बंद करणे, सार्वजनिक प्रसाधनगृहाचे निष्कासन, ‘बेस्ट’ वाहिन्यांचे स्थलांतरण, जाहिरात फलकाचे निष्कासन इत्यादी कामे पूर्ण करा तसेच शीव पुलाचे काम 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनादेखील बांगर यांनी अभियंत्यांना केल्या.

अशी सुरू आहेत कामे

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) काम नुकतेच पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम एप्रिल महिनाअखेरपर्यंत पूर्ण करून 30 एप्रिलपासून गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीस खुला करण्याचे प्रयत्न आहे.

कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेली 550 मेट्रिक टन वजनी उत्तर बाजूचा गर्डर रेल्वे भागात सरकवण्याची कार्यवाही नुकतीच पूर्ण झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी 10 जूनपर्यंत कर्नाक पूल उभारणीची उर्वरित सर्व कामे अधिक वेगाने पूर्ण केली जाणार आहेत.