
सोने आणि चांदीच्या किमतीने आजवरचे रेकॉर्ड मोडले. सोने-चांदीच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहचल्या आहेत. सोने 1 लाख 78 हजार रुपयांच्या पार पोचले. तर चांदीनेही 4 लाखांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 13 हजार रुपयांची वाढतर चांदीच्या दरात 22 हजार रुपयांची वाढ झाली. एमसीएक्सवर चांदीची किंमत प्रति किलो 4,07,456 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला.
पिवळय़ा धातूची चमक वाढली
सोन्याचे भावही गगनाला भिडत आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 75 हजार 869 रुपयांवर पोहोचला आहे, हा एक नवीन विक्रम आहे. जळगावच्या सराफा बाजारात पहिल्यांदाच केवळ 30 दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात एवढी मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 82 हजार 310 तर चांदीचे दर जीएसटीसह 4 लाख 1 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत.
किमती का वाढताहेत
अमेरिकन डॉलरच्या तीव्र घसरणीमुळे सोने आणि चांदीला बळ मिळाले आहेत.
जगभरात भू-राजकीय तणाव, व्यावसायिक अनिश्चितता असल्याने सोने, चांदीत गुंतवणूक करणे सुरक्षित मानतात.
फेडरल रिझर्व्हच्या धोरणांवर बाजार लक्ष ठेवून आहे. व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे सोने-चांदीची मागणी वाढली.





























































