सोने स्वस्त होणार? US Fed च्या बैठकीकडे जगाचे लक्ष, सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या वर्षात सोन्याच्या दरात तुफानी वाढ झाली आहे. आता सोने प्रती 10 ग्रॅमसाठी 1,10,000 रुपयांवर पोहचले आहे. वायदे बाजारासह सराफा बाजारातही सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मात्र, आता सोन्याच्या तेजीला ब्रेक लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याचे दर US Fed च्या बैठकीत होणाऱ्या निर्णयांवर अवलंबून राहणार असून या बैठकीनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सध्या जगाचे लक्ष US Fed च्या बैठकीकडे असून या बैठकीच्या परिणामानंतर सोने स्वस्त होऊ शकते आणि त्याच्या किमतीला ब्रेक लागू शकतो, असे मत तजज्ञांनी वर्तवले आहे. १७ सप्टेंबर रोजी अमेरिकन फेडच्या पॉलिसी रेटवरील निर्णयापूर्वी सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. सलग चौथ्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत तेजी आहे. सोन्याच्या किमती १०% पेक्षा जास्त वाढल्या आहेत आणि आता त्यात घसरण होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदार सावध झाले आहेत.

जागतिक परिस्थिती आणि जागतिक अर्थव्यवस्थेचाही सोन्याच्या दरावर परिणाम होतो. सध्या अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगाची चिंता वाढली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आणि सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अमेरिकेने हिंदुस्थानवर ५०% टॅरिफ लादल्यामुळे आणि रशिया-युक्रेन संघर्षात वाढ झाल्यामुळे सोन्याची झळाळी वाढली आहे. जगातील अनेक देशात भू-राजकीय तणाव आणि रशिया-युक्रेनमधील संघर्षामुळे सोन्याच्या किमतींत प्रंचड तेजी दिसून आलीय

आता गुंतवणूकदार अमेरिकन फेड रिझर्व्ह बैठकीच्या निकालांवर लक्ष ठेवून आहेत. या बैठकीनंतर सोन्याच्या किमतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. फेडची बैठक १६ सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि धोरणात्मक दरांचे निर्णय १७ सप्टेंबर रोजी जाहीर केले जातील. वायदे बाजारात म्हणजे एमसीएक्सवर २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा दर १,०९,३५६ रुपये आहे, तर देशांतर्गत बाजारात तो १,०९,७०७ रुपये आहे. या बेठकीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्यास दिवाळी आणि लग्नसराईत सोने खरेदी करण्याची संधी सामान्यांना मिळणार आहे.