ठाणेकरांसाठी गुड न्यूज, २ हजार आसन क्षमता; घोडबंदरवर लवकरच तिसरे नाट्यगृह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रसिक ठाणेकरांसाठी ठाणे पालिकेने एक गुड न्यूज दिली आहे. मासुंदा तलावकाठचे राम गणेश गडकरी रंगायतन, पोखरण रोडवरचे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह अशा दोन नाट्यगृहांबरोबरच आता घोडबंदर रोडवर तिसरे नवे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. तब्बल दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे हे भव्य नाट्यगृह असणार असून त्यासाठी १३५ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या नाट्यगृहामुळे घोडबंदर रोडवरील रसिकांसाठी घराजवळ हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांना पहिले राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह दिले. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येनुसार पोखरण रोड येथे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह उभारण्यात आले. मात्र ही दोन्ही नाट्यगृहे घोडबंदर रोडपासून लांब असल्याने आनंदनगर, कासारवडवली, वाघबीळ, ओवळा, भाईंदरपाडा आणि कावेसर भागातील रसिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन ठाणे पालिकेने घोडबंदर रोडवर नवे आणि भव्य नाट्यगृह उभारण्याचा संकल्प सोडला आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना या प्रकल्पाची घोषणा केली.

वाघबीळ येथील सुविधा भूखंडावर उभारणी करणार

घोडबंदर मार्गावर वाघबीळ येथील सुविधा भूखंडावर या नाट्यगृहाची उभारणी होणार आहे. सुमारे ७ हजार ३०० चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह उभे राहील. त्याची आसन क्षमता तब्बल २ हजार इतकी असेल. सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज होणाऱ्या या नाट्यगृहात दोन मल्टिपर्पज सभागृहेही असतील. या नव्या नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा सोहळा लवकरच होणार असल्याची माहितीही आयुक्त सौरभ राव यांनी दिली.