आदिवासी तरुणाला हूल दिली…अपमानही केला…नंतर पोलिसांनी शिकवला धडा…

इंदूरमधील भंवरकु्वा भागात एका आदिवासी तरुणावर गुंडाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा गुंड दुचाकीवरून जात असताना त्याने मुद्दाम आदिवासी तरूणाला कट मारला. तरूणाने त्याला विरोध केल्याने गुंडाने तरूणालाच मारहाण केली शिवाय बूटची लेस देखील बांधायला लावली.

या गुंडाचे नाव रितेश राजपूत असे असून, भंवरकु्वा भागात त्याने दहशत माजवली आहे. त्याच्यावर पूर्वीपासून दहा गुन्हे दाखल आहेत. त्यात आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.

पीडित तरूणाचे भंवरकुवा भागात स्वत:चे सलून आहे. सलून बंद करून तो घरी जाण्यासाठी निघाला होता. गुंड रितेश राजपूत याने पीडित तरूणाला मुद्दाम दुचाकीने धडक दिली. यावर तरूणाने त्याला गाडी नीट चालव असे म्हटले. हे ऐकताच रितेशने दुचाकी वळवली आणि तरूणाजवळ जाऊन त्याची कॉलर पकडली.

तरूणाने रितेशला विरोध केल्यामुळे त्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीपासून वाचण्याकरीता तरूणाने तेथून निघण्याचा प्रयत्न केला. तरीही रितेशने त्याचा पाठलाग करत त्याला पुन्हा थांबवले. यानंतर त्याने तरूणाला आपल्या बूटचे लेस बांधण्यास भाग पाडले.

याप्रकारानंतर तरूणाने तातडीने भंवरकुवा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला पकडले असता त्याने कान पकडून चूक झाल्याचे सांगत माफी मागितली.