कसारा घाटात गोरखपूर एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला

6

सामना प्रतिनिधी । कसारा

पहाटे साडेतीन चारचा सुमार. प्रवासी साखरझोपेत. आजूबाजूला दाट धुके पसरलेले.. निसर्गरम्य कसारा घाटातील पुलावरून गोरखपूर एक्सप्रेस धडधडत जात होती. त्याचवेळेस अचानकपणे एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला आणि एकच हल्लकल्लोळ उडाला. क्षणभर काय होते हेच समजेना.. मोठ्या आवाजाने प्रवासी खाड्कन जागे झाले. बाजूला बघताच पाचशे फूट खोल दरी. काही प्रवासी तर बर्थवरून खाली पडले आणि किंकाळ्या, आरडाओरड तसेच रडारड सुरू झाली. एक्सप्रेस पुलावर अडकून पडली होती. खाली उतरण्याचेही धाडस कोणाला होईना. कारण खोल दरीकडे पाहताच डोळेही भिरभिरत होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला. ही गाडी खाली कोसळली असती तर? या भीतीने अनेकांची गाळण उडाली. जिवंतपणीच गुरूवारी हजारो प्रवाशांनी अक्षरशः मृत्यूच्या दरीत धडधडता थरार अनुभवला.

रात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटलेली गोरखपूर एक्सप्रेस पहाटे साडेतीनच्या सुमारास कसारा घाटात आली. ही गाडी पुलावरून जात असताना इंजिनचा मागील दुसरा डबा रुळावरून घसरला. लोकोपायलटने प्रसंगावधान राखून ब्रेक दाबला. त्यामुळे गाडी जागीच थांबली, पण प्रचंड आवाज येऊन एक्सप्रेसमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट उडाली. डबा रुळावरून खाली घसरल्याचे समजताच धावपळ उडाली. प्रवासी एकमेकांवर आदळले. खिडक्यांच्या काचाही फुटल्या. लहान मुले, महिला, वृद्ध प्रवासीही घाबरले. अनेकांनी जागेवर बसूनच देवाचा धावा सुरू केला. सकाळी सहापर्यंत ही गाडी तशीच पुलावर उभी होती. दोन्ही बाजूला खोल दरी असल्याने खाली उतरणेही प्रचंड धोक्याचे होते.

चौकशीचे आदेश
कसारा घाटात ब्रिटिशकालीन भीमा पुलावर गोरखपूर एक्प्रेसला झालेल्या आजच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. त्यासाठी तंत्रज्ञांची विशेष समितीही नेमली असून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. या अपघातामुळे मुंबईहून नाशिकला व नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली,
तीन तासांनंतर मदत मिळाली

कसारा घाटात ज्या पुलावर गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला, त्या ठिकाणापासून इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशन केवळ पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते. मात्र तीन तास घटनास्थळी कोणीच फिरकले नाही. साडेसहा वाजेपर्यंत प्रवासी मृत्यूच्या दरीत अडकले होते. अखेर सकाळी दुसरी विशेष गाडी मागवण्यात आली. या गाडीने सर्व प्रवाशांना इगतपुरी स्थानकावर नेण्यात आले.

आठ तास लटकंती
गोरखपूर एक्सपेसमधील हजारो प्रवाशांची आज या अपघातामुळे तब्बल आठ तास लटकंती झाली. त्याशिवाय मनस्ताप झाला तो वेगळाच. दुपारी बाराच्या सुमारास विशेष गाडीने सर्व प्रवासी गोरखपूरकडे रवाना झाले. मात्र वेळ गेला तरी महाभयंकर अपघातातून आपण बचावलो याचेच समाधान सर्वांना होते.

चहा, वडापाववर बोळवण
इगतपुरी स्थानकात प्रवाशांची ना पोलिसांनी चौकशी केली ना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी. फक्त प्रवाशांना चहा, पाणी, बिस्किटे आणि वडापाव रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले. तोपर्यंत ताटकळत असलेल्या प्रवाशांनी शिव्यांची लाखोली वाहिली.