
सामना प्रतिनिधी । मुंबई
सीएसएमटी ते अंधेरीपर्यंत असणाऱ्या हार्बर मार्गाचा एप्रिलमध्ये गोरेगावपर्यंत विस्तार झाला. त्यानंतर सात महिने झाले तरी गोरेगाव-पनवेल थेट लोकल सेवेला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयूटीपी-2 अंतर्गत गोरेगावपर्यंत हार्बरच्या विस्ताराचे काम 2009 साली हाती घेण्यात आले. या कामातील अनेक तांत्रिक अडथळ्यांमुळे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर 2017 उजाडले. अखेर हार्बर मार्गाच्या गोरेगावपर्यंतच्या विस्ताराचे उद्घाटन 29 मार्च 2018 रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. विस्तारित मार्ग झाल्यानंतर 1 एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरीपर्यंतच्या 42 आणि चर्चगेट ते अंधेरीपर्यंतच्या सात फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून हार्बरवरील अंधेरीपर्यंत असणाऱ्या आणखी 110 लोकल फेऱ्यांचाही गोरेगावपर्यंत विस्तार केला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.
लोकल बदलावी लागते….
सध्या अंधेरी ते पनवेल अशी थेट सेवा असून त्याच्या 18 फेऱ्या होतात. त्यामुळे गोरेगावपर्यंत जाण्यासाठी प्रथम अंधेरीपर्यंतचा प्रवास पनवेलकरांना करावा लागतो. अंधेरीत उतरल्यानंतर पुन्हा दुसरी लोकल पकडून गोरेगाव गाठावे लागते. गोरेगाव ते पनवेल थेट लोकल सेवा पावसाळ्यानंतर सुरू करण्याचा प्रयत्न होता, त्याला आणखी सहा महिने लागतील. हार्बरवरील सध्याच्या वेळापत्रकात या सेवांचा समावेश केल्यास अन्य लोकलवर परिणाम होणार आहे. त्यामुळे गोरेगाव ते पनवेल थेट लोकल सेवेसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.


























































