अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2,540 कोटींचा निधी

राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी 2,540 कोटी 90 लाख 79 हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

राज्यात खरीप हंगाम, 2025 मध्ये अतिवृष्टी,पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामात बियाणे व अनुषंगिक बाबींची खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी 10 हजार रुपये प्रमाणे (तीन हेक्टर मर्यादेत) 1,765 कोटी 22 लाख 92 हजार रु. इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. जुलै ते सप्टेंबर 2025 कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे व अनुषंगिक बाबींसाठी अतिरिक्त मदत मिळण्यासाठी पुणे, नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ही मदत देण्यास मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.