गुडेघर जिल्हा परिषद शाळेच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष; छतावर प्लॅस्टिक कापड टाकण्याची ग्रामस्थांवर आली वेळ

निसर्ग चक्री वादळामध्ये गुडेघर शाळेच्या छप्पराची हानी झाली होती. निसर्ग चक्री वादळ होवून 4 वर्षाचा कालावधी लोटला तरी मायबाप सरकारला शाळेच्या छताची दुरूस्ती करण्यासासाठी अजूनही निधी उपलब्ध देता आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना गेली 4 वर्ष गुडेघर शाळेच्या छप्परावर प्लॅस्टिक कापड टाकुन पावसाळयात होणारी पाण्याची गळती थांबवावी लागत आहे.

मंडणगड तालूक्यातील गुडेघर येथे आर्दश शाळा गुडेघर नावाने जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत 1 ली ते 5 वी चे वर्ग भरतात. शाळेच्या वर्ग खोल्या 4 असून एक किचन शेड आहे. गुडेघर आणि गुडेघर बौध्दवाडीसाठी असलेल्या या शाळेच्या इमारतीच्या छप्पराची सन 2020 मध्ये घोंगावलेल्या निसर्ग चक्री वादळात हानी झाली. आज या घटनेला 4 वर्ष झाली मात्र या शासकिय अर्थात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून निधीची उपलब्धताच होत नाही. शाळेत लहान वयाची मुले प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी येत असतात त्या लहान बालकांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून गेल्या 4 वर्षापासून प्रत्येक वर्षी गुडेघर ग्रामस्थ हे स्वखर्च करून शाळेच्या इमारतीच्या छतावर प्लस्टिक कापड टाकून शाळेची इमारत झाकत आहेत. तसे यावर्षीही षासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी शाळेच्या इमारतीवर प्लॅस्टिक कापड टाकले. ग्रामस्थांनी स्व खर्चाने प्लॅस्टिक कापड खरेदी केले आणि शाळेच्या इमारतीच्या छतावर श्रमदान करत टाकले यामध्ये गुडेघर ग्रामस्थ मंडळाचे संदिप बैकर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शांताराम जाधव, वसंत वैराग, वसंत शिगवण, अंकुश कदम, मनोज वैराग, अनंत कुळे, मिलिंद पवार, सचिन पवार, ग्राम पंचायत सदस्य सुमित पवार आदी प्रमुख गावातील लोकांसह स्थानिक तसेच मुंबईत राहणा-या ग्रामस्थांनी अंग मेहनत घेत विदयाथ्र्यांची बसण्याची तात्पुरती सोय केली आहे.

गेल्या चार वर्षापासून सतत शासनाचे उंबरठे झिजवून वेळोवेळी पत्र व्यवहार असेल वा प्रत्यक्ष भेटीव्दारे लोकप्रतिनिधींना सांगून देखील अजूनही कोणालाच काही पाझर फुटलेला नाही त्यामुळे गुडेघर गावातील महत्वाची समस्या अजूनही प्रलंबितच राहीली आहे.