
देशातील केंद्र व विविध राज्यांतील सरकारने शेतकऱयांच्या हिताच्या दृष्टीने कधीच निर्णय घेतलेले नाहीत. शेतकऱयांचे नुकसान हेच सरकारी धोरण असल्याची घणाघाती टीका राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अकोला येथे केली.
शेतकऱयांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न असून आगामी काळात देशव्यापी आंदोलन छेडण्याचे सूतोवाच त्यांनी केले. अकोल्यात लुटवापसी संवाद सभेनिमित्त आले असता टिकेत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले आदींसह शेतकरी नेते उपस्थित होते.
देशात विदर्भामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. दुष्काळात होरपळून जाणाऱया शेतकऱयांना योग्य हमीभाव मिळत नाही. योग्य हमीभावाअभावी शेतकऱयांचे कोटय़वधींचे नुकसान झाले. तो पैसा दिला तरी शेतकरी समृद्ध होतील. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन सरकारने दिले होते. प्रत्यक्षात ते लागू केले नाही. दिल्लीतील सरकार शेतकरीविरोधी आहे, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला.
देशव्यापी आंदोलन करणार
देशव्यापी आंदोलनाची रूपरेषा ठरवली जात आहे. हा दौरा आटोपल्यानंतर पुढील महिन्यात चंदीगडला सर्व शेतकरी संघटनांची बैठक होणार असून त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. सरकारी धोरणाविरोधात वैचारिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न आहेत, असेही टिकैत म्हणाले.