लाडकी बहीण योजने प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम का जमा करत नाहीत? सुप्रिया सुळे यांचा सवाल

निवडणुकीपूर्वी ज्या प्रमाणे लाडकी बहीण साठी पैसे थेट खात्यात जमा केले होते, तसेच शेतकऱ्यांना का मदत दिली जात नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. तसेच पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांना जे लोक कर्जाची नोटीस पाठवत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजनेला सरकारने पैसे दिले होते. मग तेवढाच उदारपणा सरकारने दाखवावा तीच यंत्रणा आमच्या शेतकरी बंधूंसाठी लावा. काल इंदापूर मध्ये कळलं की विहिरीला पैसे मिळणार नाहीत. आमच्या शेतकरी भावांना जो तुमचा आमचा अन्नदाता आहे तो मातीशी ईमान राखतो, तुमच्या आणि माझ्या आपल्या अन्नाचा प्रश्न सोडवतो कष्टाने त्याच्यासाठी साठी एवढे किंतू परंतु निर्णय कशासाठी? एवढा वेळ का होतोय? पटकन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर का होत नाहीये? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

तसेच पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांना कर्ज भरण्याच्या नोटीसा जात आहेत. अशा लोकांवर खटले दाखल करा असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.