‘यू टर्न’, ‘हिमालयाची सावली’चे नाटय़निर्माता गोविंद चव्हाण यांचे निधन

409

यू टर्न, हिमालयाची सावली अशा दर्जेदार व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारे मराठी नाटय़सृष्टीचे आघाडीचे निर्माता गोविंद चव्हाण यांचे आज अल्पश: आजाराने निधन झाले. ते 53 वर्षांचे होते.गोविंद चव्हाण यांना रविवारी ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर बोरिवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र त्यानंतर सोमवारी पहाटे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

गोविंद चव्हाण यांनी सुप्रिया प्रोडक्शन बॅनरखाली व्यावसायिक नाटय़निर्मिती केली. ’यू टर्न’ हे आनंद म्हसवेकर लिखित,  दिग्दर्शित त्यांचे नाटक कमालीचे गाजले. सध्या रंगभूमीवर त्यांची निर्मिती असलेले हिमालयाची सावली हे नाटक गाजत होते. याशिवाय त्यांनी दुधावरची साय, चॉईस इज युवर्स, जाऊ दे ना भाई,  कथा, मदर्स डे, वन रुम किचन या नाटकांची निर्मिती केली. बोली भाषा जिवंत राहावी यासाठी चव्हाण यांनी स्पर्धाही घेतली होती. ते नककलाकारांना घेऊन नाटकांची निर्मिती करायचे. नाटय़परिषदेच्या बोरिवली शाखेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.

चव्हाण यांच्यावर बोरिवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नाटय़परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अभिनेता पंढरीनाथ कांबळे, निर्माता संघाचे प्रमुख कार्यकाह राहुल भंडारे, ’हिमालयाच्या सावली’चे सहनिर्माता सुभाष रेडेकर, संतोष काणेकर, रत्नाकर जगताप आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या