ग्रामसेवकासह विस्तार अधिकाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

15व्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल मंजूर करून पंचायत समितीकडे पाठविण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना पारे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह सांगोला पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडले आहे. सांगोला येथे बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. ग्रामसेवक सुरेश सुधाकर फासे (वय 45), विस्तार अधिकारी श्रवण बाजीराव घाडगे (वय 56) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार हे पारे ग्रामपंचायतीचे सदस्य असून, 15व्या वित्त आयोगातून पारे-गोरडवस्ती येथे पाइपलाइनचे काम मंजूर झाले होते. हे काम पारे ग्रामपंचायतीला मिळाले होते. त्याअनुषंगाने या कामाची सर्व जबाबदारी पार पाडण्याकरिता सरपंचांनी लेखी आदेशान्वये तक्रारदारांची नियुक्ती केली होती. यानुसार हे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाचे बिल मंजूर होऊन मिळावे यासाठी तक्रारदारांनी पाठपुरावा केला होता. यावेळी ग्रामसेवक सुरेश फासे याने या बिलावर सही करून ते सांगोला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रवण घाडगे यांच्याकडे सादर करण्याकरिता व स्वतःकरिता एक टक्का याप्रमाणे 1500 रुपये आणि पंचायत समितीतून बिल मंजूर होण्याकरिता विस्तार अधिकारी घाडगे यांना 1500 रुपये अशा तीन हजार रुपयांची मागणी केली होती. विस्तार अधिकारी घाडगे यांनी तडजोडीअंती 500 रुपये कमी देण्यास सांगून उर्वरित रक्कम ग्रामसेवक फासे याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत ‘प्रतिबंधक’च्या पथकाने सापळा रचून ग्रामसेवक सुरेश फासे याला रंगेहाथ पकडले, तर श्रवण घाडगे याला पंचायत समितीतून ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस नाईक स्वामी, घाडगे, पोलीस शिपाई सन्नके, उडानशिव यांनी ही कारवाई केली.