दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसकडून मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशभरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
राजीव गांधी जयंतीच्या तयारीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आढावा बैठक हॉटेल लीला येथे आज पार पडली. त्या बैठकीनंतर चेन्नीथला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. आजच्या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपाबद्दल चर्चा झाली नसून त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा येत्या 7 तारखेला होणाऱया महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल असे चेन्नीथला यांनी सांगितले. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, खासदार वर्षा गायकवाड, आमदार सतेज पाटील, डॉ. नितीन राऊत, नसीम खान, भाई जगताप, अस्लम शेख उपस्थित होते.
महाराष्ट्र वाचवणे हाच आघाडीचा संकल्प – पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी मिंधे सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली. महाभ्रष्टयुती सरकार महाराष्ट्रातील जमिनी, संपत्ती विकत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाचवणे हाच महाविकास आघाडीचा संकल्प आहे, असे पटोले म्हणाले. आजच्या बैठकीत याच मुद्दय़ांवर चर्चा झाली, असे ते म्हणाले. पटोले यांनी यावेळी मिंधे सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’वरही भाष्य केले. महायुती सरकार महिलांना फक्त दीड हजार रुपये देणार आहे, परंतु काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना लखपती केले जाईल, असे ते म्हणाले.