
हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी शुक्रवार 13 मार्च रोजी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने भव्य शिवराय संचलनाचे आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संचलनाचा शुभारंभ होणार आहे. वाजतगाजत, पारंपरिक पद्धतीने साजऱया होणाऱया या शिवराय संचलनानिमित्त फोर्ट परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनभेदी जयघोषांनी दुमदुमणार आहे.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीनंतर शिवराय संचलनाचे आयोजन केले जाते. यंदाही त्याची जोरदार तयारी सुरू आहे. शुक्रवारी दुपारी 4 वाजता फोर्टच्या हॉर्निमन सर्कल येथे संचलनाला सुरुवात होऊन रिझर्व्ह बॅंकेच्या अमर बिल्डिंग ते गेट वेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि मानवंदना देऊन संचलनाची सांगता होईल.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे या संचलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराय संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी आणि संलग्न संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संचलनात सहभागी होणार आहेत.
शिवकालीन मर्दानी खेळ
विशेष आकर्षण म्हणजे दांडपट्टा, ढाल-तलवार, लाठीकाठी, बाराबनाटी, चौरंग चक्र यासारख्या शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आणि आई भवानीच्या गोंधळासाठी वादन करण्यात येणारे संबळ वादन सादर केले जातील. याशिवाय ढोलताशा पथक, नाशिक बाजा, लेझीम पथक असेल. संचलनाच्या मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाईल.
- फोर्ट परिसरामध्ये मराठी माणसांचा ठसा उमटवणाऱया भव्यदिव्य शिवराय संचलनात सर्व शिवप्रेमींनी मोठय़ा संख्येने सामील व्हावे, असे आवाहन लोकाधिकार महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी केले आहे. संचलन यशस्वी होण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी व संलग्न समित्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
झेंडे, पताका, बॅनर… भगवामय परिसर
या संचलनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा फुलांची आकर्षक सजावट केलेल्या लॉरीमध्ये स्थापन करण्यात येईल. संचलन मार्गावर भगवे झेंडे, पताका, बॅनर्स लावले जाणार असल्याने फोर्ट परिसर भगवामय होणार आहे. संचलनात भगव्या टोप्या, गमजे घालून कार्यकर्ते सामील होतील व भगव्या नऊवारी साड्या प्रधान करून महिला मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.
हुतात्मा स्मारक आणि शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
संचलनादरम्यान हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल.
- फोर्ट येथून ढोलताशाच्या गजरात व तुतारी वादनाने शिवराय संचलनाला सुरुवात होईल. फुलांनी सुशोभित केलेल्या वाहनात सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असेल तसेच फुलांनी सजवलेली शिवपालखी वाहून येणारे मावळे असतील. पालखीसोबत वारकरी भजन पथक असेल.





























































