भटक्या कुत्र्यांचा आभारी; त्यांच्यामुळे जगात प्रसिद्धी मिळाली ; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या विधानाची चर्चा

नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था)- भटक्या कुत्र्यांमुळे मला जगभरात प्रसिद्धी मिळाली, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी केले आहे. मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात माझे छोटेसे योगदान दिले. परंतु भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणामुळे मला देशातच नाही तर जगभरात ओळख मिळाली. त्याबद्दल मी भटक्या कुत्र्यांचा आभारी आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या विधानाची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे आयोजित मानव वन्यजीव संघर्षावरील प्रादेशिक परिषदेत नाथ बोलत होते. 22 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाने न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 11 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात सुधारणा केली होती. या आदेशावर टीका झाली होती. त्यानंतर विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने म्हटले की, भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतर त्यांचे लसीकरण करण्यात यावे आणि त्यांना पुन्हा जिथून पकडले त्याच अधिवासात सोडण्यात यावे. तसेच जे कुत्रे रेबीज संक्रमिक आहेत त्यांना मात्र सोडू नये, असे आदेश दिले होते. दरम्यान, कार्यक्रमाला न्यायाधीश सूर्यकांत, बी.व्ही. नागरत्न आणि एम.एम. सुंदरेशही उपस्थित होते.

प्राणीप्रेमीच नाही तर भटके कुत्रेही आशीर्वाद देत आहेत

सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचाही मी आभारी आहे. कारण त्यांनी हे प्रकरण मला सोपवले. मला केवळ प्राणीप्रेमीच नाही तर भटके कुत्रेही आशीर्वाद आणि शुभेच्छा देत आहेत, असेही नाथ म्हणाले. नुकतेच आम्ही लॉ एशिया पोला समिटसाठी गेलो होतो. तिथे मला भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आले. असेही नाथ पुढे म्हणाले.