गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम पालकमंत्रीपद सोडणार; स्थानिक पालकमंत्री हवा, नागरिकांची मागणी

गोंदिया जिल्ह्याला अद्यापपर्यंत स्थानिक पालकमंत्री अभावानेच मिळाले आहेत. जिल्ह्याच्या निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर, राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले आहे. तर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत साडेचार वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाच पालकमंत्री मिळाले आहेत. हे पाचही पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातील असून या पालकमंत्र्यांनी फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, अशा महत्त्वाच्या सणाला झेंडावंदनासाठी जिल्ह्यात हजेरी लावली आहे.

नुकताच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपण गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता गोंदिया जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळणार आहे. मात्र, अशातच नागरिकांनी आता गोंदिया जिल्ह्याला स्थानिक किंवा आजूबाजूंच्या जिल्ह्यातलाच पालकमंत्री द्यावा, अशी मागणी केली आहे.