विद्यार्थ्यांना स्वसुरक्षेचे धडे, गोरेगावच्या महाराष्ट्र विद्यालयाचा महत्त्वाचा उपक्रम

नूतन विद्यामंदिरच्या गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांची सुरक्षा या विषयावर मार्गदर्शनपर सभा पार पडली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांनी सदैव जागृत असले पाहिजे. आपण आपल्या कामात कितीही व्यस्त असलो तरी नियमित मुलांशी सुसंवाद साधत त्यांना जाणून घेता आले पाहिजे, असे मार्गदर्शन यावेळी पालकांना करण्यात आले. सभेसाठी सुमारे 400 पालक हजर होते.

सभेला मार्गदर्शक म्हणून निवृत्त सहपोलीस आयुक्त आनंद भालवणकर, गोरेगाव पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाच्या अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमिता मराठे, पोलीस निरीक्षक राजश्री सोनवणे , ज्ञानेश्वर कदम , नरेंद्र बांदेकर उपस्थित होते. नूतन विद्यामंदिर संस्थेचे सचिव अनिल देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि सभेला सुरुवात झाली.

शाळेतील प्रत्येक घटक संस्था, प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर आणि पालक यांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी डोळसपणे पार पाडली तर अनुचित घटनांना आळा बसेल. सोबत पोलीस प्रशासन मदतीला आहेच, अशा प्रकारचे विचार प्रमुख वक्त्यांनी मांडले तसेच मुख्याध्यापिका वसुधा कामतेकर, दिपाली राऊत, नूतन विद्यामंदिर संस्था प्रतिनिधी शंकर पटनाईक, महेश करमरकर, प्रतिभा टरफटला, सौम्या शेट्टी यांनीही पालकांना मार्गदर्शन केले.

शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन

सुरुवातीला प्रास्ताविकात शाळेमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रारपेटी, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती व अन्य कार्यरत असलेल्या समित्यांबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी शाळेत केली जाते. याविषयी माहिती शाळेतील शिक्षक मसुरकर यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहल कदम, योजना आळेकर, बाळकृष्ण सावंत आणि स्वप्निल सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.