
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी गुरुवारी राजीनामे दिले आहेत. या मंत्रिमंडळात एकूण 16 सदस्य होते, ज्यात आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री आणि नऊ राज्य मंत्र्यांचा समावेश होता.
मुख्यमंत्री पटेल यांना वगळता सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे पक्षाने घेतले आहेत, असे एका भाजप नेत्याने पीटीआयला सांगितले. हा फेरबदल सध्याच्या सरकारच्या कार्यकाळातील जवळपास तीन वर्षांनंतर आणि राज्यातील महत्त्वाच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांपूर्वी करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतींचा समावेश आहे.
गुजरात विधानसभेत एकूण 182 सदस्य आहेत आणि त्यात जास्तीत जास्त 27 मंत्री (म्हणजे सभागृहाच्या 15 टक्के) असू शकतात. या महिन्याच्या सुरुवातीला राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांची भाजपच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. भूपेंद्र पटेल यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवार सकाळी 11.30 वाजता केला जाईल. राज्यपाल आचार्य देवव्रत हे या समारंभात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.